Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात
देशात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. अशातच आता कोरोना विरूद्धच्या लढ्यामध्ये मदत करण्यासाठी देशातील उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई : देशात कोरोना व्हायरस फोफावत असल्याचं चित्र दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पार पोहोचली आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असून यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे.
भारतात अग्रगण्य असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी कोरना विरूद्धच्या लढ्याला मदत केली आहे. त्यांनी आपला संपूर्ण पगार कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या निधीला देण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. एवढचं नाहीतर आपल्या सहकाऱ्यांनाही आपला पगार निधी म्हणून देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये आणखीन काही घोषणा करणार असल्याचेही महिंद्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी कोरोनासाठीच्या लढ्याला निधी दिल्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली आहे. तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटवरुन कोरोनासाठी मदत करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी या महामारीविरोधात लढण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. यावेळी देशाला आमची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोक भविष्याबद्दल संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मी खास चिंतेत आहे. आम्ही आमच्यामार्फत मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत.'
दरम्यान, देशातील उद्योगपतींनी घेतलेल्या या निर्णयाचं नेटकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच उद्योगपतींकडूनही अनेकांनी मदत करावी असं आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; तर कोरोना बाधितांचा आकडा 89 वर
Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू
Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद