Maharashtra Coronavirus | राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद, फक्त मुंबईतचं 8,646 लोकांना लागण
राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात आज 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 43 हजार 183 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून लॉकडाऊनच्या छाया गडद होताना दिसत आहेत.
राज्यात आज 32 हजार 641 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 24,33,368 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.2% एवढा झाला आहे. राज्यात आज 249 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.92% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,99,75,341 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28,56,163 (14.30 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19,09,498 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर 18,432 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 3,66,533 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 8011कोरोना रुग्णांची नोंद तर 65 बाधितांचा मृत्यू झाले तर मुंबईत आजच्या एका दिवसांत 8646 कोविड रुग्णांची नोंद झाली करण्यात आली आहे.
राज्यात आज 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 32641 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2433368 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 366533 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2021
10 ते 20 वयोगटात वाढताहेत कोरोना रुग्ण
महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 10 ते 20 वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे. मार्चमध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील तब्बल 55 हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोना बाधित झाल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं आहे.
नवीन ट्रेंडमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक
तात्याराव लहाने एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, राज्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे , नवीन ट्रेंड मुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन ट्रेंडमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या स्ट्रेनच्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते, आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. आधी 50 वयाच्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत. 5 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना संक्रमण होत आहे. पण यात 10 वयावरील मुलांना कोरोनाची अधिक लागण होत आहे, असं त्यांनी सांगितलं.