Maharshtra Lockdown | 'वर्क फ्रॉम होम'साठी राज्य सरकारची चाचपणी, सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता
वर्क फ्रॉम होमसाठी राज्य सरकारची चाचपणी, सरसकट लॉकडाऊन ऐवजी राज्य सरकार सर्व खाजगी कंपन्यांना आदेश देण्याची शक्यता.
मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची छाया गडत होत चालली आहे. मात्र, मागच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याने लॉकडाऊनला लोक विरोध करत आहे. त्यामुळे आता सरकारकडून इतर पर्यायांचा विचार करत आहे. याच पार्श्वभूमीवर 'वर्क फ्रॉम होम'साठी राज्य सरकार चाचपणी करत आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून, आता राज्यात वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊन गर्दी कमी करता येईल का याचा विचार ठाकरे सरकार करत आहे. काल एकाच दिवसात 227 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. याचमुळे आता राज्य सरकार सतर्क झाले असून, गर्दी कमी कशी करता येईल याची चाचपणी राज्य सरकार करत आहे. वर्क फ्रॉम होमवर भर देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. वर्क फ्रॉम होम बंधनकारक करावे यासाठी राज्य सरकार खासगी कंपन्यांना आदेश देणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात एकीकडे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे ठरणारे नाही. यातून जर मार्ग काढायचा असेल तर ज्यांना शक्य असेल त्यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. यामध्ये आयटी कंपन्या तसेच इतर ऑफीसनचा समावेश असणार आहे. याच दृष्टीकोनातून राज्य सरकारने चाचपनी सुरू केली आहे. वर्क फ्रॉम होम केले तर बरेच जण घरुनच काम करतील आणि ट्रेन, बस आणि मेट्रोची गर्दी कमी होऊ शकते. याचमुळे लॉकडाऊन करण्यापेक्षा वर्क फ्रॉम होम करून गर्दीवर आळा घालण्याचा सरकारचा विचार आहे.
याआधी होती ही मार्गदर्शक सूचना
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असताना राज्य शासनाने मार्च महिन्यात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली होती. त्यानुसार सर्व खासगी आस्थापना आणि कार्यालयांमध्ये 50 टक्केच कर्मचारी उपस्थिती राहील, असे स्पष्ट करण्यात आले होते. तसेच शासकीय कार्यालयांसाठी 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचा आदेश आधीच काढण्यात आला होता. कोविड काळात धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले होते. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे, असेही या आदेशात म्हटले होते. मात्र आता वर्क फॉर्म होमची चाचपणी राज्य सरकार करत आहे.
राज्यात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता, सरकारसह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढणार?
राज्यात दिवसेंदिवस दिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, आता आकडा 30 ते 40 हजारच्या घरात पोहोचला आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, 10 एप्रिलपर्यत हा आकडा आणखी वाढून 60 ते 65 हजाराच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सातत्याने वाढणारी ही आकडेवारी राज्यसरकारची डोकेदुखी वाढणारी ठरणार आहे.
लोकांमध्ये भिती नाही
गर्दी टाळा, मास्क लावा असे सरकारच्यावतीने वारंवार सांगितले जात असताना देखील नागरिक नियम पाळत नाहीत. याचमुळे लोकांचा हलगर्जीपणा कोरोना रुग्ण वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. एवढेच नाही तर जर लोकांचा हलगर्जीपणा असाच राहिला तर कोरोना आकडेवारी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.