(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जेलमध्ये असलेल्या कैद्यांनी सध्या जेलमध्येचं राहिलेलं बरं, बाहेर परिस्थिती जास्त भयानक : हायकोर्ट
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक विभाग एकापाठोपाठ एक सील करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखीन एका नव्या माणसाला बाहेर सोडून त्याच्यासह इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करता येणार नाही.
मुंबई : तुरुंगामध्ये असलेल्या कैद्यांनी सध्या तुरुंगामध्येचं राहिलेलं बरं, कारण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाहेरची परिस्थिती सध्या जास्त भयानक आहे. या शब्दांत जामीनासाठी हायकोर्टात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं मोलाचा सल्ला दिला आहे. जितेंद्र मिश्रा या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या आरोपीनं जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यापुढे सुनावणी पार पडली. मिश्राविरोधात खुनाच्या आरोपाखाली सध्या खटला सुरू असून तो गेले 18 महिने नवी मुंबईतील तळोजा जेलमध्ये आहे.
"तुम्हाला कल्पना नसेल की मुंबईत सध्या काय सुरूय", वरळीचं उदाहरण देत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी या सुनावणी दरम्यान आपली चिंता व्यक्त केली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील अनेक विभाग एकापाठोपाठ एक सील करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखीन एका नव्या माणसाला बाहेर सोडून त्याच्यासह इतरांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका पत्करता येणार नाही. असं मत स्पष्ट करत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी जितेंद्र मिश्राचा तात्पुरता जामीन अर्ज फेटाळून लावला.
तर सोलापूरच्या एका व्यक्तीनं अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरही गुरूवारी सुनावणी पार पडली. यात गंमतीनं न्यायमूर्ती पटेल म्हणाले की, सध्या पोलीस कोरोनाशी मुकाबला करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्याकडे छोट्या मोठ्या अन्य गुन्हेगारांकडे पाहायलाही वेळ नाही. त्यामुळे चिंता करू नका, सध्या देशभरातील जेलमध्ये बंद असलेल्या गुन्हेगारांना बाहेर सोडलं जातयं. त्यामुळे तुम्हाला बाहेर अटक झाली तरी लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलीस तुम्हाला नेणार कसे?, आणि ठेवणार कुठे?, हाही प्रश्नच आहे.
मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारच्या सुनावणीचा दिवस एक ऐतिहासिक म्हणावा लागेल. कारण व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी नऊ प्रकरणांवर सुनावणी घेतली. यात वकील, पक्षकार यांच्यासह माध्यमातील प्रतिनिधींनीसह सुमारे 450 जणांनी आपापल्या घरातून व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅप 'झूम' च्या माध्यमातून आपली हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचं कामकाज सध्या केवळ दुपारी 12 ते 2 या दोन तासांसाठीच सुरू आहे. त्यातही कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता हायकोर्टानं सुनावणी डिजिटल पद्धतीनं घेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
संबंधित बातम्या :