Children Vaccination : मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाचा खोळंबा; काय आहेत कारणं...
12 to 14 years Vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात जरी झाली असली तरी आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील काही ठिकाणच्या मुलांचा मात्र खोळंबा झाला आहे.
12 to 14 years Vaccination : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात झाली. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु झालं. 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात जरी झाली असली तरी आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील काही ठिकाणच्या मुलांचा मात्र खोळंबा झाला आहे. लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
मुंबईत 2 तासांनंतर मुलांचं लसीकरण सुरु
मुंबईत दुपारी 12 पासून हे लसीकरण सुरू होणार होते. मात्र लसीकरणाच्या अॅपवर 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाचा स्लॉट अपडेट झाला नसल्याचं समोर आलं. त्यामुळे गेल्या दोन-अडीच तासापासून विद्यार्थी लसीकरण केंद्रात खोळंबून होते. त्यात आज मुंबईचा पारा देखील वाढला आहे. त्यामुले मुलं आणि त्यांच्या पालकांचे मोठे हाल झाल्याचं पाहायला मिळालं. 12 ते 14 वयोगटातील लसीकरण अपडेटच झाले नसल्याने दोन तास विद्यार्थी लसीकरण केंद्रात बसून होते. मुंबईत पहिल्याच दिवशी गोंधळामुळे तब्बल 2 तासांनंतर मुलांचं लसीकरण सुरु झालं.
नाशिक : लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने बराच वेळपर्यंत 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला नाशिक जिल्ह्यात सुरुवात झालेली नव्हती.
औरंगाबादमध्ये चांगला प्रतिसाद
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणापाठोपाठ आता 12 ते 14 वर्षे वयोगटाच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरातील तीन केंद्रांवर सुद्धा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. मनपाच्या प्रियदर्शनी इंदिरानगर शाळेत मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला.
पुण्यात लसीकरण खोळंबलं
आजपासून 12 ते 14 वर्षाच्या मधील मुलांसाठी लसीकरण सुरू होणार होतं. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करावी असा आदेश शासनाकडून आला होता. पण लसीकरणासाठी असलेले कोविन ॲप चालत नसल्यामुळे लसीकरणासाठी पुण्यात मुलांची नोंदणी झालीच नाही. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण उशीरापर्यंत सुरू झालेले नव्हतं. पुण्यात कुठल्याच लसीकरण केंद्रावर लसीकरण वेळेत सुरु झालं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- World Coronavirus : कोरोनाची नवी लाट! चीनमध्ये लॉकडाऊन, तर रशियात सर्वाधिक मृत्यू; जगभरात 6 कोटी सक्रिय रुग्ण
- Coronavirus Updates : कोरोना महामारीचा अंत जाहीर होणार? WHO कडून तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha