(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada Water Issue : मराठा आंदोलनावरून मराठवाड्यात 'पाणीबाणी' करण्याचा डाव? जायकवाडीत पाणी सोडू नका पत्रावरून वाद पेटला!
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाची सर्वाधिक दाहकता मराठवाड्यात असल्याने पाणीबाणी करण्याचा कुटील डाव शासकीय पातळीवरून होत आहे का? अशी चर्चा रंगली आहे.
Marathwada Water Issue : राज्यात मराठा आंदोलनावरून वाद पेटला असतानाच आता पाण्यावरूनही ठिणगी पडली आहे. मराठा आंदोलन सुरु असल्याने जायकवाडीत पाणी सोडू नका असं लेखी पत्र गोदावरी मराठवाडा (Marathwada) पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंत्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना लेखी पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची सर्वाधिक दाहकता मराठवाड्यात असल्याने पाणीबाणी करण्याचा कुटील डाव शासकीय पातळीवरून होत आहे का? अशी चर्चा रंगली आहे. आता या पत्रावरून राजकीय पडसाद उमटले आहेत. पहिल्यांदा ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे. त्यामुळे या मुद्यावरून आता राजकीय रणकंदन सुरु होण्याची चिन्हे आहेत.
जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक
अशोक चव्हाण यांनी ट्विट करून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा. उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत 8.6 टीएमसी पाणी सोडण्याच्या 30ऑक्टोबर 2023 रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला मा. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी आग्रही मागणी मी पुन्हा करत आहे.
उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध आहे? उगाच मराठा आंदोलनाला बदनाम करू नका अन् पाणी सोडण्याचे टाळू नका, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तर आम्ही अधिवेशन चालवू देणार नाही
पाणी सोडू नका पत्रावरून ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्यामुळे सध्या जायकवाडीतवरच्या धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे पत्र देऊन सरकारला मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करायचे आहे असा आरोप ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केला. जर पाणी तात्काळ सोडले नाही तर आम्ही हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत स्थगिती देण्यास नकार दिल्याने जायकवाडीमध्ये तत्काळ पाणी सोडणे अपेक्षित असताना अशाप्रकारे मराठा आरक्षण आंदोलनाला पुढे करून हे सरकार या आंदोलनाला बदनाम करत आहे. मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना दिलासा देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचा काम सरकार करत असल्यामुळे तत्काळ पाणी सोडले नाही, तर आम्ही येणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा राहुल पाटील यांनी सरकारला दिला.
इतर महत्वाच्या बातम्या