Congress : काँग्रेसचा नवा फॉर्म्युला, 'एक परिवार, एक तिकीट'; सुरुवात गांधी घराण्यापासून होण्याची शक्यता
One Family One Ticket Formula: काँग्रेसमध्ये आता तिकीट वाटपाबद्दल नवं धोरण राबवलं जाणार असून एका परिवारातील एका व्यक्तीलाच तिकीट देण्याचा विचार सुरू आहे.
नवी दिल्ली: परिवारवादी म्हणून सतत विरोधकांच्या निशाण्यावर असणाऱ्या काँग्रेस पक्षाने मेकओव्हरचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून या पुढे आता एक परिवार, एक तिकीट असा फॉर्म्युला राबवला जाणार असल्याचं कळतंय. सोमवारी काँग्रेसची वोर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यातच हा निर्णय झाल्याचे कळतंय. महत्वाचं म्हणजे या निर्णयाची अमलबजावणी ही गांधी परिवारापासून सुरु होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
या निर्णयाची जर खरंच अंमलबजावणी झाली तर येत्या काळात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यापैकी एकच व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात उतरू शकेल. त्यामुळे सोनिया गांधी या स्वतःला निवडणूक राजकारणातून दूर ठेवणार का असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतोय. तसेच जर हे पाऊल गांधी परिवारापासून सुरू होत असेल, तर जी मंडळी प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढावी अशी मागणी करत असतात त्यांचीही अडचण होईल .
एकीकडे जी-23 गटाने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे चिंतन शिबिर होणार आहे. त्याच्या आधीच हे महत्वाचे बदल करून पक्ष हा वेगवेगळ्या विचारांना खुला आहे हे संकेत दिले जाणार असल्याची माहिती आहे. हे फक्त बाहेर विरोधकांनाच नाही तर पक्षाच्या आतील काही विसंगत किंवा दबलेले सूर आहेत त्यांच्यासाठीही उत्तर ठरू शकते आणि येणाऱ्या काळात जर राहुल गांधी हे पक्षाची धुरा परत सांभाळणार असतील, तर त्याचेही उत्तर विरोधकांना आधीच या निर्णयातून दिलं जाईल असं मानलं जाऊ शकतं.
देशभरातच राजकीय नेते हे तर स्वत: निवडणुकीच्या रिंगणात असतात. पुन्हा ते आपल्या परिवारातील सदस्यांसाठी तिकीट मागतात हे सामान्य आहे. ही अवस्था प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक पक्षात आहे. एकाच परिवारातून किती लोकांना तिकीट द्यायचे हा प्रश्न शरद पवारांनी महाराष्ट्रात उपस्थित केला होता. पक्षासाठी तेव्हा त्याला एक राजकीय किनार होती असं मानलं गेले. समाजवादी पक्ष, जम्मू अॅन्ड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स किंवा पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टी असो अथवा टीआरएस - यांच्यासारखेच इतर अनेक पक्ष आहेत की ज्याचे नेतृत्व हे एकाच परिवाराकडे आहे. पण राष्ट्रीय स्तरावर एकेकाळी गांधी नावाची जी ताकत होती तिला परिवारवादाच्या निशाण्यावर घेत भाजप आणि इतर विरोधकांनी काँग्रेसला पुरते हैराण केले.
महत्त्वाच्या बातम्या: