बत्तीस वर्षांत विदर्भाच्या मातीतून काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री नाही, नाना पटोलेंना मुख्यमंत्रिपद मिळालं तर त्यात वावगं काय? : नितीन राऊत
Nitin Raut : काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असे भाकित केलं होतं. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी अत्यंत सुचक वक्तव्य केलंय.
Maharashtra Politics नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhan Sabha Election 2024) राज्यात काँग्रेसला (Congress) 'अच्छे दिन' येणार असून मुख्यमंत्रिपद हे मेहनत करणाऱ्या नाना पटोले (Nana Patole) यांना मिळणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी केलं. मुख्यमंत्रिपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असंही ते म्हणाले. नागपुरात नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची नागपूर शहरासाठीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील, असे भाकित व्यक्त केलं. दरम्यान, आता या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया उमटत आहे. असे असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी अत्यंत सुचक वक्तव्य करत विकास ठाकरे यांच्या सुरात सुर मिसळवत अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिला आहे.
विदर्भाच्या मातीचा काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री राज्यात गेल्या बत्तीस वर्षांत नाही. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री तर अजिबात झालेला नाही. जेव्हा आमचे पक्ष नेतृत्व जातीय जनगणनेबद्दल विचार व्यक्त करतात आणि ते घटनेतही हे नमूद आहे की, "जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी" असे असताना पक्षनेतृत्व (बहुजन समाजाचे नाना पटोले ) आमच्या कडे असेल, त्याबद्दल बोलण्यास वावगं काय? त्याबद्दल बोललंच पाहिजे. असे म्हणत मुख्यमंत्री पदासाठी नाना पटोले यांच्या दावेदारी संदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते नितीन राऊत यांनी अत्यंत सुचक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नितीन राऊत?
निवडणूकीचे तंत्र कार्यकर्त्यांच्या उत्साह आणि जोशावर उभं राहत असतं. कार्यकर्ता जो म्हणतो त्याला काही आधार असतात. विदर्भाच्या मातीचा मुख्यमंत्री बत्तीस वर्ष झालेला नाही. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री तर अजिबात झालेला नाही. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते तशी मागणी करत असले तर त्यात वावगं काय? शेवटी निर्णय हायकमांडचा राहील. मात्र कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे. ती समजून घेतली पाहिजे. असेही नितीन राऊत म्हणाले. लोकसभा निवडणूक नाना पटोले यांच्या नेतृत्वात लढलो. त्यात आमच्या पक्षाला मोठं यश मिळालं. आता ही पटोले पक्षाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून याव्या, अशी भावना आहे. असे असताना एखादा चेहऱ्यावर चर्चा होत असेल तर त्यात वाईट काय?
जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी
गेले 32 वर्ष विदर्भातून मुख्यमंत्री पदाचा काँग्रेसचा चेहरा मिळालेला नाही. आम्ही आघाडी धर्म दुखावलेला नाही. आम्ही पक्षांतर्गत पक्षाच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करत आहोत. निवडणुकीनंतर निवडून आलेले आमदार आणि पक्षाचा हायकमांड निर्णय घेणार आहे. पक्षांतर्गत चर्चा होणं योग्य आहे. ती चर्चा होत आहे. त्या चर्चेतून नेतृत्व उभे होत आहे. कोणीही असं समजू नये माझं बाळ चांगले आहे आणि दुसऱ्याचा बाळ चांगले नाही. यापूर्वी आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल वक्तव्य केले आहे. मात्र आम्ही त्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही, आमचा हेतू कुणाला दुखावण्याचा नाही.
विदर्भात बहुजन समाज सर्वात मोठा आहे आणि शक्तिशाली आहे. त्यामुळे त्या समाजाबद्दल मत मांडणं गैर नाही. आम्ही कोणाला दुखावण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही नितीन राऊत म्हणाले. आमचे नेतृत्व जेव्हा जातीय जनगणने बद्दल विचार व्यक्त करतात आणि घटनेतही हे नमूद आहे की "जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी" आणि तसा नेतृत्व आमच्या कडे असेल, त्याबद्दल बोलण्यास वावगं काय त्याबद्दल बोललंच पाहिजे. असेही ते म्हणाले.
ही बातमी वाचा :