Pune MPSC Student News : ... तर अनेक स्वप्नील लोणकर बघायला मिळतील; पास होऊनही नियुक्ती होत नसल्याने स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी आक्रमक
प्रशासनाने किंवा सरकारने भीक म्हणून आम्हाला नियुक्ती द्यावी. नाही तर अनेक स्वप्नील लोणकर होतील. विद्यार्थी आत्महत्या करतील, अशी आक्रमक भूमिकादेखील या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
Pune MPSC Student News : स्पर्धा परिक्षा पास होऊनसुद्धा (MPSC student Protest) अद्याप नियुक्ती झाली नसल्याने पुण्यातील स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी (Pune) कार्यालयासमोर त्यांनी एकत्र येत आंदोलन केलं आहे. तीन वर्षांपुर्वी परीक्षा पास झाले मात्र अनेक घोटाळ्यांमुळे किंवा अन्य काही कारणामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहे. त्यामुळे त्यांचे उमेदीचे वर्ष सरकारमुळे वाया जात असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
मागील तीन वर्षांपासून सरकारकडे आणि अधिकाऱ्यांकडे अर्ज केले अनेकदा त्यांना निवेदनेसुद्धा दिली मात्र या सगळ्यांचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे भीक मांगो आंदोलन करावं लागत आहे. प्रशासनात जाऊन काम करायचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी अथक परिश्रम केले, अभ्यास केला मात्र आमच्या सारख्या भावी अधिकाऱ्यांनाच स्वत:च्या हक्कासाठी आदोलन करावं लागत आहे, ही दयनीय बाब असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. तीन वर्ष प्रत्येक मंत्र्यांकडे धाव घेतली. स्वप्नील गेला मात्र त्यासारखे अनेक स्वप्नील अजून नियुक्तीसाठी वाट पाहत आहे. काही दिवसात महाराष्ट्राला अनेक स्वप्नील लोणकर बघायला मिळतील. त्यामुळे प्रशासनाने किंवा सरकारने भीक म्हणून आम्हाला नियुक्ती द्यावी. नाही तर अनेक स्वप्नील लोणकर होतील. विद्यार्थी आत्महत्या करतील, अशी आक्रमक भूमिकादेखील या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
नियुक्ती नाही झाली तर घरचे लग्न लावणार
आम्ही आमच्या अभ्यासात चोख होतो. पास देखील झालो मात्र नियुक्ती होत नसल्याने आम्हाला वेळोवेळी कुटुंबीयांना वेगवेगळी कारणे द्यावी लागतात. तीन वर्ष आम्ही नियुक्ती होण्याची वाट बघत आहोत. घरच्याकडून लग्नासाठी सतत विचारणा केली जात आहे. त्यांना नेमकं काय उत्तरे द्यायचं हाच प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला आहे. आता काही दिवसात जर नियुक्ती झाली नाही तर घरचे थेट लग्न लावतील, अशी भीतीदेखील काही तरुणींनी व्यक्त केली आहे.
पोलीस व्हेरीफिकेशनला वेळ लागत असल्याने नियुक्त्या न करण्याचा निर्णय
1143 जणांना रुजू करून घेण्यासाठी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. मात्र पोलीस व्हेरीफिकेशनला वेळ लागत असल्याने या सर्वांच्याच नियुक्त्या न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आधी आपणाला नियुक्त करून घ्यावं आणि त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांनी तीनही विभागांच्या सचिवांना भेटून केलीय. मात्र आपणाला जोपर्यंत वरून आदेश येत नाहीत तोपर्यंत आपण निर्णय घेणार नसल्याचं या सचिवांनी त्यांना सांगितलंय .