मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे; संजय राऊत यांचा भाजप आणि राज ठाकरेंना टोला
Aurangabad Sabha : औरंगाबादमध्ये उसळळेली लाट ही दिल्लीच्या तख्ताला हादरा दिल्याशिवाय राहणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद : काहीजण औरंगाबादमध्ये आले आणि गेले, पण मराठवाड्यामध्ये शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपला लगावला आहे. औरंगाबामध्ये उसळळेली लाट ही दिल्लीच्या तख्ताला हादरा दिल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली होती, तर औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर भाजपने जल आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली.
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
चीनच्या ताब्यातील कैलास भारतात आणा
संजय राऊत म्हणाले की, "देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्याची झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. मोदी शाहंना या झळा बोलत नाहीत. महागाईवर बोललं तर ते ज्ञानवापी मशिदीवर बोलतात. पण कैलासवरील शिवलिंग चीनच्या ताब्यात आहे, ते त्यांनी परत मिळवावं. पण ते यावर बोलणार नाहीत."
सुभाष देसाई काय म्हणाले?
येत्या दोन वर्षामध्ये जायकवाडी ते औरंगाबाद शुद्ध पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण होणार असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. औरंगाबादला आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली असून पाणीपट्टीही अर्ध्यावर आणली आहे. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने पारित केला आहे, पण केंद्राकडून अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही असं सुभाष देसाई म्हणाले.
मेट्रो रेल्वेचा प्रकल्प औरंगाबादमध्ये आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून त्याचा आराखडा बनवण्याचं काम महापालिकेनं सुरू केल्याची माहितीही सुभाष देसाई यांनी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका मोठ्या कंपनीने औरंगाबादमध्ये गुंतवणूक करावी यासाठी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत असंही ते म्हणाले.