Prakash Ambedkar : 'एवढं' सुरू असताना आता तरी मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
Prakash Ambedkar : राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
Prakash Ambedkar : महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर पोहचले असून आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भ्रष्टाचार प्रकरणावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप आता हत्येच्या आरोपापर्यंत आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप गंभीर वळणावर आले आहेत. आता हे आरोप-प्रत्यारोप फक्त आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप प्रत्यारोप राहिले नाहीत. तर, आता अनेक हत्यांचे आरोप होत आहेत. हत्यांच्या आरोपांबाबत एखाद्या पोलीस अधिकारी किंवा गृहमंत्र्यांनी वक्तव्य देऊन चालणार नाही. त्यासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी मौन सोडून वक्तव्य करावे आणि सत्य परिस्थिती समोर आणावी असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. एंटेलिया स्फोटक प्रकरण आणि शंभर कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांनीच माफीचा साक्षीदार व्हावं, असेही प्रकाश आंबडेकर यांनी सांगितले.
काँग्रेसकडून प्रतिसाद नाही
येत्या महापालिका निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव पाठवला आहे. आघाडी करण्याचा हा प्रस्ताव पाठवून महिना उलटला तरी काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
विनायक राऊतांचे नारायण राणेंवर आरोप
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. नारायण राणे स्वत: चा भूतकाळ विसरले का? श्रीधर नाईकांच्या खुनातील आरोपी कोण होते? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. सिंधुदुर्गातल्या जुन्या राजकीय हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्र्यांना सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले.
नारायण राणेंचे आरोपांचे प्रहार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करुन हत्या करण्यात आली. मात्र, तिने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.