(Source: Poll of Polls)
Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांबाबत येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज पार पडली. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठा निर्णय घेतला. रायगडच्या संवर्धनासाठी जवळपास 606 कोटींचा खर्च आहे. यासाठी 20 कोटी खर्च झाले आहेत, तर 20 कोटी रुपये आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांबाबत येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेऊ, असा शब्दही उद्धव ठाकरेंनी दिला.
अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. आमची शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा होती, मात्र हातात काहीही नव्हतं. मात्र आता राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत की, मागील सरकारने जे आदेश दिलेले त्यांचं वास्तववादी चित्र काय आहे? याबाबत माहिती द्या. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करायची नाही, त्यामुळे सर्व माहिती घेऊन त्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मी मुख्यमंत्री म्हणून जे आदेश दिलेत त्याला हवं तर श्वेतपत्रिका म्हणा किंवा काही म्हणा पण शेतकऱ्यांना मदत मिळाली की नाही याबाबतचं वास्तव मला कळलं पाहिजे, यासाठी हे निर्देश दिले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार असेल. राज्यात कोणालाही दहशत वाटेल, असं वातावरण दिसणार नाही. महाराष्ट्र देशातील नंबर एकचं राज्य आहे आणि राज्याच्या वैभवात भर पडेल असं काम करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत राज्यातील जनतेला दिलं.