(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दर्जेदार शिक्षणासाठी डिसले गुरुजींसारख्या प्रयोगशील शिक्षकांना सोबत घेत आराखडा बनवा : मुख्यमंत्री
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मुंबई : जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. काल सायंकाळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार अशी भावना सत्कार समारंभाला उत्तर देताना रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.
डिसलेंचे कार्य ध्येयवेडाचे उदाहरण - मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसून त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपुर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.
सचिन तेंडुलकरकडून रणजितसिंह डिसले गुरुजींचं कौतुक, 'या' कारणासाठी केलं विशेष अभिनंदन
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचे उत्तम काम- उपमुख्यमंत्री सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणाले, तंत्रज्ञानातील नाविन्यपुर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या क्रमवारीत ते आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तयार केलेली क्यु आर कोडेड पुस्तके राज्यातील एक कोटीहून अधिक मुले वापरत असून जगभरातील देशातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी आणि ज्ञानवर्धक शिक्षण कसे देता येईल यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या ज्ञानाचा वापर करावा असेही पवार यांनी सांगितले.
इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जात असून आता इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या शाळा म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ओळखल्या जात आहेत. यासाठी रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात म्हणाले, जिल्हाधिकारी झालेले अनेकजण जि.प शाळेचे विद्यार्थी होते. वेगळी वाट निवडून शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या डिसले यांच्यासारख्या शिक्षकांमुळे इंटरनॅशनल म्हणवणाऱ्या शाळांतील मुलेही एक दिवस परत जि. प शाळेत शिकायला येतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डिसले यांच्यासारख्या शिक्षकांचा राज्याला अभिमान - शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड डिसले सरांनी शैक्षणिक क्षैत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हे तर साऱ्या जगभर पोहचविणाऱ्या रणजितसिंह डिसले सरांच्या कार्याचा अभिमान वाटतो असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काढले.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.
'ग्लोबल टीचर प्राईज' विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांचं दलाई लामा यांच्याकडून कौतुक!
रणजीत डिसले यांचं कार्य?
लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करुन परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. रणजीतसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत.
रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. याआधी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.