एक्स्प्लोर
'नाणार'वर बोलणं उद्धव ठाकरेंनी टाळले; प्रकल्पविरोधक मुंबईत धडकणार!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये नाणार रिफायनरीबाबत जाहिरात आल्याने कोकणातलं वातावरण तापलं होतं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या वादावर बोलण्याचे टाळल्याचं पाहायला मिळाले.

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच कोकण दौऱ्यावेळी नाणारचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रिफायनरीबाबत जाहिरात आल्यानंतर कोकणातलं वातावरण पुन्हा एकदा तापलं. प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी झालीच पाहिजे, असा नारा देत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले. तर, प्रकल्प विरोधक देखील काहीही झालं तरी प्रकल्प येऊ देणार नाही. अद्याप आम्ही आंदोलनाची तलवार म्यान केलेली नाही, असं म्हणत मैदानात उतरले. त्यामुळे गणपतीपुळ्याच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार? प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करणार का? यावर चर्चा सुरू झाली होती. पण, उद्धव यांनी जाहीर सभेत यावर काहीही भाष्य केलं नाही. सभेनंतर उद्धव यांची भेट घेण्यासाठी सागवे गावचे प्रकल्पविरोधक देखील आले होते. शिवाय, समर्थक देखील भेटीसाठी प्रयत्नशील होते. पण, वेळेअभावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याची माहिती 'एबीपी माझा'ला देण्यात आली. जाहीर सभेत उद्धव यांनी काहीही भूमिका स्पष्ट न केल्यानं शिवसेनेची नेमकी भूमिका तरी काय? याबाबत चर्चा सुरू झाली. प्रकल्पविरोधक मुंबईत भेट घेणार - उद्धव यांची भेट झाली नाही तरी काही हरकत नाही. आमचा उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे. ते आमचा विश्वासघात करणार नाहीत. अशा शब्दात जाहीर सभेच्या ठिकाणी आलेल्या प्रकल्पविरोधकांनी आपला विश्वास व्यक्त केला. पण, प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही लढा तीव्र करू अशा इशारा देखील दिला. शिवाय, आमचं म्हणणं मांडण्यासाठी आम्ही मुंबईत जात उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं या प्रकल्पविरोधकांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात भास्कर जाधवांच्या 'त्या' कृतीचीच चर्चा काय आहे शिवसेनेची भूमिका? प्रकल्पाच्या समर्थनार्थ स्थानिक शिवसेना नेते, विभागप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य मैदानात उतरले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका सुरू झाली. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होणार नाही. उद्धव ठाकरे आपल्या शब्दावर ठाम आहेत. नाणारमध्ये जे लोक शिवसेना नेते असल्याचा सांगत दलालांचा बुरखा पांघरून आहेत, त्यांच्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली. 'सामना'त रिफायनरीची जाहिरात छापल्याने नाणारवासीय आक्रमक नाणारवरून कोकणात पुन्हा वादळ - 'सामना'मध्ये आलेली जाहिरात वादाला कारणीभूत ठरली. त्यानंतर पुन्हा एकदा नाणार येणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे शिवसेना आणि राज्यसरकार यावर आपली भूमिका कधी आणि काय स्पष्ट करणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. परिणामी आगामी काळात कोकणात नाणारचा मुद्दा पुन्हा एकदा गाजणार असल्याचं चिन्ह आहे. Nanar Project | मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा, नाणार रिफायनरी प्रकल्पावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर






















