'अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा; ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची फुल्ल बॅटिंग
'अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुल्ल बॅटिंग केली.
CM Eknath Shinde at Maharashtra Winter Assembly Session: 'अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फुल्ल बॅटिंग केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अजित दादांकडून कालचे निर्णय झाले त्याचे स्वागत होईल असं वाटलं होतं. पण तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या हे मोजत होते. दादांना वाटलं नव्हतं की एवढे मोठे आम्ही निर्णय घेऊ, आमच्या सरकारच्या कामाचा हा वेग त्यांनी पाहिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो. ते म्हणाले की असे उद्योग जात नसतात. त्यांना काय माहीत की सरकार बदलणार आहे. बाकीचे इंटरेस्ट ठेवलं तर कोण येणार इथे, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, आम्ही 70 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी 40 हजार कोटींचे प्रकल्प विदर्भात आहेत, असंही ते म्हणाले.
'वर्षा'वर पाटीभर लिंब सापडली
मुख्यमंत्री म्हणाले की, अडीच वर्षांत एका प्रकल्पाला मान्यता दिली आम्ही 18 प्रकल्पांना मान्यता दिली. चुका सुधारल्यानंतर माणूस सुधारतो. आम्ही वर्षावर नंतर गेलो तर तिकडे 'वर्षा'वर पाटीभर लिंब सापडली. प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं काम करायचं म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही, असंही ते म्हणाले.
शिवसेना राष्ट्रवादीची झाली म्हणून आम्ही बाहेर पडलो
मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना राष्ट्रवादीची झाली म्हणून आम्ही बाहेर पडलो. रोज आरोप करतात. रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांना तुम्ही आवाहन देता. कोविड असताना आम्ही रस्त्यावर उतरलो, लोकांना दिलासा दिला.
आजही मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. जयंत पाटील आज सभागृहात नाहीत, ते पाहिजे होते. जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीची शिवसेना झाली. मुख्यमंत्री यांच्या लालसेपायी ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले त्यांनी सांगायची गरज नाही. हिऱ्याच्या पोटी गारगोटी, यापुढे मी काही बोलत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.