(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री
नोव्हेंबर महिना संपण्याआधी आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेऊ. मराठा आरक्षणावरुन कुणीही श्रेयाची लढू नये, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अहमदनगर : मराठा आरक्षणाबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सादर झाला. त्यानंतर आता अहवालावर अभ्यास करुन सरकारकडून पुढची पावलं उचलली जाणार आहेत. मात्र अद्यापही मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे श्रेयवादात न अडकता 1 डिसेंबरला जल्लोष करा, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "मराठा आरक्षणाबाबत अहवाल सादर झाला आहे. काही दिवसात उर्वरीत कार्यवाही देखील करण्यात येईल. मात्र काही लोक अजूनही आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. सरकार निर्णय घोणार आहे. त्यामुळे आंदोलन करण्यापेक्षा 1 डिसेंबरला जल्लोष करा."
"नोव्हेंबर महिना संपण्याआधी आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेऊ. मराठा आरक्षणावरुन कुणीही श्रेयाची लढू नये. एक समाज मोठ्या संख्येनं एकत्रित आला, त्यामुळे त्या समाजाच्या पाठिशी उभं राहिल्याने हे सर्व निर्णय होत आहेत", असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
अहवाल सादर, आता पुढे काय?
आता हा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयात सोपवण्यात येईल. येत्या 19 तारखेपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. मुख्यमंत्री आणि सहा सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती याबाबत फेरआढावा, अभ्यास आणि वाचन केलं जाईल.त्यानंतर अहवाल तत्वत: की पूर्णत: मान्यता करावा याबाबत निर्णय घेतला जाईल. मंत्रिमंडळ बैठकीत अहवालाला मंजुरी मिळाली की तो हिवाळी अधिवेशनात पटलावर मांडण्यात येईल. यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
मराठा आरक्षणाबाबतच्या वैधानिक प्रक्रियेसाठी 15 दिवस लागतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी काल (14 नोव्हेंबर) सांगितलं होतं.
दरम्यान, मागासवर्गीय आयोगातील प्रमुख बाबी 'एबीपी माझा'च्या हाती आल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं की नाही याबाबत सर्व जातीच्या आणि समाजाच्या लोकांची मतं विचारली होती. त्यामध्ये सर्वच जातीमधील लोकांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे.
संबंधित बातम्या