ये जंगलराज नही चलेगा! राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, लंकेंनाही डिवचलं
राहुल झावरेने पानमंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानमंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
मुंबई : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाचे निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी बाजी मारली. तर भाजपचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यानंतर पारनेर विधानसभा मतदारसंघात राडा झाला. खासदार निलेश लंके (MP Nilesh lanke) यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पारनेर शहरातच आठ ते नऊ जणांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात आले. या मारहाणीत राहुल झावरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता या प्रकरणावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गंभीर आरोप केला असून निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावरही निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर पोस्ट करत म्हटले आहे की, ये जंगलराज नही चलेगा... आम्हाला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला.
राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला
पारनेरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपणे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली. हाती दहा-पंधरा कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला. यांच्या डोक्यात सत्ता इतकी गेली की उन्मत्त झालेल्या या राहुल झावरेने पानमंद यांच्या घरात घुसून एका गर्भवती महिलेवर आणि पानमंद यांच्या मातोश्रींवर शिवीगाळ करत जमावासह हल्ला केला.
निलेश लंके झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार ?
या नराधमाला कायदा तर शिक्षा देईलच मात्र नवनिर्वाचित खासदार लंके झावरेला शिक्षा देणार का पाठीशी घालणार हे पहावं लागेल. म्हणतात ना आलेलं यश पचवता आलं पाहिजे आणि मिरवतादेखील आले पाहिजे. पण महविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली. पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही. झावरे सारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील, असे त्यांनी म्हटले आहे.
सुजय विखेंचा प्रचार केला म्हणून धमकावल्याचा आरोप
दरम्यान, अहमदनगरला खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तर आता राहुल झावरे यांनीच आम्हाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप एका महिलने केलाय. तसेच सुजय विखे पाटील यांचा प्रचार केला म्हणून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या घटना घडत असल्याचा देखील आरोप करण्यात आलाय. गोरेगाव येथील विखे समर्थक प्रितेश पानमंद यांच्या पत्नी हर्षदा पानमंद यांनी राहुल झावरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. माझ्या पतीला शोधण्यासाठी लंके समर्थक राहूल झावरे आणि त्यांचे इतर सहकारी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते, मात्र ते तिथे नसल्याने झावरे घरी आले. तर घरी येऊन शिवीगाळ करून त्यांनी मला माराहाण केल्याचा आरोप हर्षदा पानमंद यांनी केलाय. याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा