नामांतर! रस्त्यावरील लढाईनंतर आता कायदेशीर लढाई; विरोधात 69 हजार आक्षेप अन् समर्थनार्थ साडेचारशे अर्ज
Chhatrapati Sambhaji Nagar : आतापर्यंत नामांतराविरोधात आतापर्यंत 69 हजार आणि समर्थनात साडेचारशे अर्ज आले आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar City Name Change: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान याच नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 मार्चची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला असताना समर्थनात आणि विरोधात हजारो अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत नामांतराविरोधात 69 हजार आणि समर्थनात साडेचारशे अर्ज आले आहेत.
गेल्या 35 वर्षांपासून औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याची मागणी होत होती. दरम्यान केंद्राने मंजुरी दिल्याने अखेर दोन्ही शहरांचे नावं बदलण्यात आली आहे. पण याच नामांतराच्या निर्णयाला कुठे विरोध तर कुठे समर्थन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरील लढाई सोबतच आता कायदेशीर लढाई देखील दोन्ही बाजूने उभी केली जात आहे. याचाच भाग म्हणून नामांतराच्या विरोधात आणि समर्थनात विभागीय आयुक्त कार्यालयात अर्जांचा अक्षरशः पाऊस पडतोय. आक्षेप अर्ज सादर करण्यासाठीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना नामांतराविरोधात आतापर्यंत 69 हजार आक्षेप आणि हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहेत. तर समर्थनात साडेचारशे अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे, एकाच दिवसात 24 हजार आक्षेपाचे अर्ज विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाले आहे. तर नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात दाखल होणाऱ्या अर्जातून आपली भूमिका भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केला जातोय.
आक्षेप अर्जातील दावे...
- नामांतराचा ठराव, परिपत्रक, राजपत्र बेकायेशीर असून रद्द करावा.
- औरंगजेब यांना क्रुर आणि जातियवादी शासक असल्याचे जनमानसात भासवून जनतेचे डोके भडकविण्यात येत आहे.
- इतिहासाच्या नोंदीनुसार त्याकाळी होत असलेल्या सर्वचे सर्व लढाया हे केवळ राजकीय तसेच सत्ता विस्तारासाठी झालेल्या आहेत.
- नामांतराचा निर्णय रद्द करून शहराचे नाव औरंगाबाद कायम ठेवण्यात यावे.
विरोधातील अर्जातील दावे...
- नामांतराच्या विरोधात आलेल्या कोणत्याही हरकती, आक्षेपाचा विचार करू नयेत.
- औरंगजेब क्रूरकर्मा जुलमी शासक असल्याच्या कथा सांगणारा इतिहास शासनाच्या अनेक संग्रहालयात उपलब्ध आहे.
- औरंगजेब या क्रूरकर्मा शासनकर्त्याने अत्यंत अमानुषपणे तसेच जुलमी पद्धतीने राजवट केली असल्याने त्या व्यक्तीच्या नावाला विरोध.
- शासनाने शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवावे
वेगवेगळ्या भागात कॅम्प
नामांतराच्या समर्थनात आणि विरोधात अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने अधिकाधिक अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात मोहीम राबवत कॅम्प देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे नामांतराच्या मुद्यावरून कालपर्यंत रस्त्यावरीची लढाई लढणारे नेते आता कायदेशीर लढाईसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :