Amravati : तब्बल एक क्विंटल वजनाचा 'श्री बुधभूषणम' ग्रंथ; अमरावतीच्या अवलियाची कमाल
Amravati News : अमरावती येथील अजय लेंडे यांनी तब्बल चार वर्षांपासून कठोर मेहनत घेत 'Shri Budhbhushanam' या महाकाय ग्रंथाचे हस्तलिखित ग्रंथ तयार केलं आहे.
Amravati News : छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम 'Shri Budhbhushanam' हा ग्रंथ लिहिला. अमरावती येथील अजय लेंडे यांनी तब्बल चार वर्षांपासून कठोर मेहनत घेत या महाकाय ग्रंथाचे हस्तलिखित 'बुधभूषणम' ग्रंथ तयार केला आहे. हा ग्रंथ तब्बल 1 क्विंटल 24 किलोचा आहे आणि हा एकूण 164 पानांचा असून याची लांबी 5 फूट तर रुंदी 3 फूट इतकी आहे. या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला असून किमान पुढील 200 वर्ष हा ग्रंथ सुस्थितीत राहील. विशेष म्हणजे या ग्रंथासाठी खास शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा वापर करून हस्तलेखनाद्वारे ग्रंथ तयार करण्यात आला आहे. यासाठी विशेष शाईचा वापर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्य आणि ज्ञानाबद्दल तरुणाईमध्ये आकर्षण आहे. महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी श्री बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला. सामाजिक चळवळीत काम करतांना तरुणाईकडून बरेचदा या ग्रंथाबद्दल विचारणा होत असे. मात्र हा ग्रंथ सहजासहजी उपलब्ध होत नसल्याची अडचण लक्षात घेऊन अमरावती येथील अजय लेंडे यांनी या ग्रंथाचे पुनर्लेखन करण्याचे ठरविले. इतक्या मोठ्या स्वरूपात हा ग्रंथ तयार होण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे असं अजय लेंडे सांगतात. या ग्रंथासाठी खास शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा वापर करून हस्तलेखनाद्वारे ग्रंथ तयार करण्यात आला आहे. यासाठी विशेष शाईचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ग्रंथाचे वजन तब्बल एक क्विंटल 24 किलो असून हा ग्रंथ एकूण 164 पानांचा आहे आणि याची लांबी 5 फूट तर रुंदी 3 फूट इतकी आहे. या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागला असून किमान पुढील 200 वर्ष हा ग्रंथ सुस्थितीत राहील अशी अपेक्षा त्यांना आहे..
या ग्रंथाच्या निर्मितीसाठी अजय लेंडे यांच्या पत्नी प्राध्यापक सारिका लेंडे यांनीही मोलाचा वाटा दिला आहे.अजय लेंडे यांना चार वर्षे जी मेहनत घ्यावी लागली ती मी जवळून अनुभवली आहे. यासाठी घर सांभाळुन मी देखील शक्य तेवढी मदत केली आहे. ग्रंथ पूर्ण झाल्याचे समाधान तर आहेच पण आजच्या तरुण पिढीने या ग्रंथाचे अवलोकन करावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी असं त्यांनी सांगितले.
अजय लेंडे यांनी चार वर्षे अथक परिश्रम करून हा ग्रंथ तयार केला, ही संपूर्ण विदर्भासाठी भूषणावह बाब आहे. हा ग्रंथ जनतेपर्यंत पोचावा याकरता संभाजी महाराज जयंती उत्सव समिती कडून 14 मे रोजी अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे एका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सचिव भैय्यासाहेब मेटकर यांनी दिली.