ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला नरेंद्र मोदींकडून मंजूरी; विधानसभेआधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Thane Integral Ring Metro: अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे: वर्षानुवर्षे ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे.
अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प (Thane Integral Ring Metro) असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKnath Shinde) यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतुकोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आहे.
29 किमी अंतराच्या या प्रकल्पात 22 स्थानके-
सुमारे 12,200 कोटी रुपयांच्या आणि 29 किमी अंतराच्या या प्रकल्पात 22 स्थानके आहेत. या प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे. नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरी पाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः सन 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ अंदाजे 6.47 लाख प्रवाशांना मिळणार आहे.
कसा असेल प्रकल्प?:
सदर प्रकल्पाचा खर्च- 12,200 कोटी रुपये
मार्ग लांबी- 29 किमी, त्यापैकी 26 किमी उन्नत आणि तीन किमी भूमिगत
स्थानके- 22, त्यापैकी 20 उन्नत आणि 02 भुयारी
फायदा- प्रकल्पामुळे मूळ ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर, तसेच शहरातील विविध भागांशी थेट रिंग मेट्रो मार्गाने प्रवास शक्य
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रासाठीचे निर्णय:
-वाढवण बंदरासाठी 76 हजार 200 कोटीचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर
-पुणे मेट्रो फेज-1 प्रकल्पाच्या दक्षिणेकडे स्वारगेट ते कात्रज पर्यंत 5.46 किमी लांबीच्या विस्तारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
-प्रकल्पाची एकूण पूर्णता किंमत ₹ 2,954.53 कोटी आहे आणि 2029 पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
-जवळपास ₹12,200 कोटी खर्चाच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
-नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, साकेत इत्यादी प्रमुख भागांना जोडण्याचा प्रकल्प