Kolhapur District Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेले उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र
Kolhapur : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही ,असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असतील.
Kolhapur District Gram Panchayat Election : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही, अशी व्यक्ती राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पाच वर्षांच्या कालावधीकरीता पंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असतील. अशा उमेदवारांची यादी kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14 (ब) (1) अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये जिल्ह्यातील हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा व करवीर तालुक्यातील एकूण 446 उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी निवडणूक गावपातळीवर पार पडणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 20 डिसेंबरला पार पडेल. (Kolhapur District Gram Panchayat Election)
कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. 31 मे 2022 पर्यंत अस्तित्वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत
- करवीर 53
- कागल 26
- पन्हाळा 50
- शाहूवाडी 49
- हातकणंगले 39
- शिरोळ 17
- राधानगरी 66
- गगनबावडा 21
- गडहिंग्लज 34
- आजरा 36
- भुदरगड 44
- चंदगड 40
मतदार जागृतीबाबत सायकल रॅली संपन्न
दरम्यान, मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ.एम.एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणूक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ.प्रल्हाद माने तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या