(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushama Andhare : मराठा समाज नेतृत्व करण्यास सक्षम नाही, हे दाखवण्यासाठी भाजपकडून घाणेरडे राजकारण; सुषमा अंधारेंचा आरोप
भाजपचे राजकारण महाराष्ट्रद्रोही आहे. शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले असले, तरी त्याच्या दुप्पट आमदार निवडून आणण्याची क्षमता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
Sushama Andhare : भाजपचे राजकारण महाराष्ट्रद्रोही आहे. शिवसेनेचे चाळीस आमदार फोडले असले, तरी त्याच्या दुप्पट आमदार निवडून आणण्याची क्षमता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची प्रतिमा मलिन करण्याचा पद्धतशीरपणे डाव सुरू आहे. सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरील माइक बाजूला करणे, चिट्टीवर लिहून देणे या प्रकारातून मराठा समाज नेतृत्व करण्यास सक्षम नाही हे दाखवण्यासाठी भाजपा घाणेरडे राजकारण करत आहेत. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघावर भाजप दावा करत आहेत. शिंदे गटाला संपविण्याचे धोरण भाजपचे असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.
महाराष्ट्र अस्थिर करुन राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे वळविण्याचा डाव आहे. राज्यातील सगळे प्रकल्प गुजरातला जात असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का? ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत की गुजरातचे ? असा सवाल त्यांनी केला. भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि शिंदे गटातील नाराजी यामुळे 2023 मध्ये राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कारवाई संदर्भात बोलताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले की त्यांनी पहिल्यांदा शिंदे गट आणि भाजपमधील वाचाळ नेत्यांना आवरावे. मंत्री नारायण राणे यांच्या दोन बारक्या पोरांना समज द्यावी. मंत्री गुलाबराव पाटील अब्दुल सत्तार यांचा सरंजामी माज कसा उतरविणार ? देवेंद्र फडणवीस केवळ शिंदे गट व भाजपचे गृहमंत्री नाहीत तर राज्याचे गृहमंत्री आहेत याचे त्यांनी सदैव भान ठेवावे असे म्हणाल्या.
कोणता शेतकरी आपल्या चार्टर विमानाने शेतात उतरतो?
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुरुंदवाड महाप्रबोधन यात्रेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. अंधारे यांनी आपल्या रोखठोक शैलीत बंडखोरांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये का? मग एवढं कशासाठी बोलता? रिक्षाचालक सांगता, तर शेतकरी मध्येच कोठून आणला? तुम्ही जे सांगता ते, तरी लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या मुलाने जरुर मुख्यमंत्री झालं पाहिजे, पण गरीब शेतकऱ्याच्या. एकनाथ भाऊ तुम्ही गरीब शेतकरी आहात का? मुंबईतून जाताना स्पेशल चॅर्टर विमानाने जाता. असा कोणता शेतकरी आहे दाखवा जो चॅर्टरने आपल्या शेतात जातो? एबीपी माझाने याबाबत स्टोरी केली होती. तो माझ्याकडे आता नाही, मी तुम्हाला दाखवतो. त्या पुढे म्हणाल्या एवढं मोठं घर बांधता, रिसाॅर्ट बांधता मग गरीब शेतकरी कसा काय असू शकतो? तुम्ही घराणेशाहीवर बोलता, तर तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात का आणले?
इतर महत्वाच्या बातम्या