Buldhana Accident : दुर्घटनाग्रस्त बस आधी लोखंडी पोलवर आदळली, मग पलटी झाली अन् अचानक भीषण आग लागली; नेमका कसा घडला अपघात?
Buldhana Accident Updates: नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात 25 प्रवासी दगावले आहेत.
Buldhana Samrudhi Expressway Bus Accident : महाराष्ट्राची (Maharashtra News) आजची सकाळ अत्यंत दुःखद बातमीनं झाली. नागपूरहून (Nagpur) पुण्याला (Pune) जाणाऱ्या एका खाजगी बसला भीषण अपघात (Accident News) झाला. या बसमध्ये अंदाजे 32 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या 32 पैकी 25 प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 8 प्रवासी सुखरुप असल्याचं कळतंय. बसचा हा भीषण अपघात बुलढाणाजवळच्या सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ झाला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बस ही नागपुरातील विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती मिळत आहे.
नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. साधारणतः मध्यरात्री 1.30 वाजता हा अपघात झाला. बस सर्वात आधी लोखंडी पोलला धडकली त्यानंतर काही अंतरावर जाऊन बस पलटी झाली आणि बसनं अचानक पेट घेतला, अशी अपघाताबाबत प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. बुलढाण्याचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने देखील घटनास्थळी उपस्थित होते. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती सांगितली.
बुलढाणा पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त बसमधून आतापर्यंत 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. 8 जण या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.
कसा झाला अपघात?
"बस रात्री 1.35 च्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक एका खांबावर जाऊन आदळली. याबाबत ड्रायव्हरला विचारलं असता टायर फुटल्यानं बस जाऊन आदळल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर खांब बाजूला जाऊन उडाला. त्याचवेळी बस पुढे जाणाऱ्या डिझेल टँकरवर जाऊन आदळली. डिझेल टँकचा स्फोट झाला आणि मोठ्या स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली आणि अचनाक गाडीत आग लागली.", अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. तसेच, गाडीचा अपघात झाला त्यावेळी प्रवासी गाडीत झोपले होते. त्यामुळे गाडीचा अपघात झाला याबाबत अनेकांना कल्पना नव्हती. त्यावेळी जेवढे प्रवासी काचा फोडून बसबाहेर पडले, तेवढे प्रवासी सुखरुप बचावले आहेत, अशी माहितीही पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
बसमधील सर्वाधिक प्रवासी हे नागपूरचे होते. त्यानंतर बस मध्ये यवतमाळला थांबली होती. त्यामुळे यवतमाळमध्येही काही प्रवासी बसमध्ये चढल्याची माहिती मिळत आहे. अजून कोणते प्रवासी कुठून बसमध्ये चढले याबाबत मात्र योग्य माहिती अद्याप हाती आलेली नाही, असंही पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.
दरम्यान, पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून अपघाताबाबत अधिक माहिती घेत आहेत. तसेच, अपघात कसा झाला याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.