Bhendwal Bhavishyavani : पाऊसपाणी मुबलक, राजा कायम राहणार; तर रोगराईचा नायनाट; भेंडवळचा अंदाज जाहीर
Bhendwal Bhavishyavani 2022 : बुलढाण्यातील भेंडवळमध्ये काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्तावेळी घट मांडणी करण्यात आली आणि आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मंडणीतील वर्षभराचं भाकितं वर्तवलं गेलं.
Bhendwal Bhavishyavani 2022 : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे (Buldhana Bhendwal Bhavishyavani 2022) भाकित जाहीर करण्यात आलं. 350 वर्षांची परंपरा असलेली आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेली प्रथा म्हणजे असलेली 'भेंडवळची घट मांडणी'. 3 मे रोजी संध्याकाळी ही घटमांडणी पार पडली आणि आज भाकीत जाहीर करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकित केलं जातं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचंही भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं होतं. अखेर या घटमांडणीचं भाकीत जाहीर झालं आहे.
भेंडवळ घटमांडणीनुसार, यंदा जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस असेल, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. तर यंदाही बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे. तर गेल्या दोन वर्ष सामना करत असलेल्या कोरोनाचा यंदा मात्र नायनाट होण्याची शक्यता आहे. कारण यंदा देशात रोगराई राहणार असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आला आहे.
पावसाबाबत काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- यंदा देशात वरुणराजाची कृपा असणार आहे. जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस पडणार आहे
- ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे.
- अवकाळीची चिंता मात्र वर्षभर शेतकऱ्यांना सतावणार आहे.
पिकांबाबत काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- यंदा कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील आणि पिकांना भावही चांगला मिळेल
- वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिकं मध्यम स्वरूपात येतील.
- एकंदरीत देशात पीक चांगलं येईल.
- बळीराजाला मात्र चिंता जाणवेल, कारण पिकांना भाव मिळणार नाही.
- लवकर येणाऱ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- यावर्षीही रोगराई राहणार नाही
- कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात रोगराई राहणार नाही.
राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- देशाच्या राजाची गादी कायम राहणार
- सत्ता पालट होणार नाही.
देशावरील संकटावर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?
- देशाच्या सरंक्षण खात्यावर जास्त दबाव राहणार नाही.
- देशाचं संरक्षण चांगलं राहील.
- आर्थिक अडचणीत देश असेल.
काय आहे भेंडवळ भविष्यवाणी?
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्यात येते. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत.
भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?
भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.
(टीप : 'भेंडवळची घट मांडणी' ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. एबीपी माझा केवळ या घटनेचं वार्तांकन करतंय. घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही.)