Breaking News LIVE : पिंपरी चिंचवडमधील स्थायी समितीच्या उर्वरित पंधरा सदस्यांना एसीबीने नोटीस
Breaking News LIVE Updates, 22 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी वादग्रस्त वक्तव्य करून वादाला तोंड फोडलं आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबववण्यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांकडून फोन येतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी मी असं वक्तव्य केलंच नासल्यचं सांगत घुमजाव देखील केलाय. त्यामुळे तो केंद्रीय मंत्री नेमका कोण, असा प्रश्न आता निर्माण झालाय.
सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळेच झाला, या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक चिघळला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला आहे? तसेच बांधकामं तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत? या आदेशाची प्रत मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात केली.
यावेळी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी देखील पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचे नाव का घेण्यात आले नाही? असा प्रश्न महापौर नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला. महापौरांच्या या वक्तव्यावर आज भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी भूमिका स्पष्ट केली.
महासभेत भाजपच्याच प्रश्नाला उत्तर देत महापौरांनी अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई थांबवावी यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा कॉल आल्याचं सांगितलं. हा फोन कोणत्या मंत्र्यांनी केला? त्या मंत्र्यांचं नाव सांगणार नाही, मात्र अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी कोणाचेही फोन आले तरी अशा बांधकामांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सभागृहात स्पष्ट केलं. मात्र काल (मंगळवारी) घुमजाव करत मी असं म्हणालो नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास लोकांनी केला, असं सांगून त्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
राज्य सरकारला मोठा धक्का! शिर्डीच्या समितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची मनाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाला मनाई केली आहे. न्यायालयाने पुर्वी स्थापन केलेली समितीच पुढील आदेशापर्यंत काम पाहणार आहे. तज्ञ लोकांची समिती स्थापन न करता राजकीय नेमणुका का केल्या? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.
राज्य सरकारने 16 सप्टेंबरला शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ जाहीर केलंय. मात्र, आता न्यायालयाने मनाई केल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. 12 जणांचे विश्वस्त मंडळाचे गॅझेट काढून जाहीर केलं आहे. यात अहमदनगर जिल्ह्याला झुकते माप देण्यात आल्याचे दिसून येतंय.
कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील 9 जणांना विश्वस्त मंडळात संधी देण्यात आलीय तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सहकारी राहुल कणाल यांनासुद्धा विश्वस्त पदाची लॉटरी लागलीय.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या ओबीसी आरक्षण संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. राज्य सरकारने केंद्राकडून एम्पिरिकल डेटा मागितला आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारचे नेमकं उत्तर काय आहे हे कोर्टात उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार NEET परीक्षेबाबत आढावा घेणार
राज्य सरकार NEET परीक्षेबाबत आढावा घेणार आहे. तामिळनाडू सरकारने NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात धर्तीवर ही परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आहे का याबाबत राज्य सरकार आढावा घेणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.
MBBS प्रवेशासाठी देशपातळीवर NEET ही एकच सामाईक परीक्षा घेतली जाते.
पिंपरी चिंचवडमधील स्थायी समितीच्या उर्वरित पंधरा सदस्यांना एसीबीने नोटीस
पिंपरी चिंचवडमधील स्थायी समितीच्या उर्वरित पंधरा सदस्यांना एसीबीने नोटीस धाडली आहे. येत्या आठ दिवसांत त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 18 ऑगस्टला स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह पाच जणांना एसीबीने रंगेहाथ अटक केली होती. तेंव्हा जाहिरातदार व्यवसायिकाकडून स्वीकारलेली लाच स्थायीच्या सोळा सदस्यांसाठी स्वीकारल्याच न्यायालयात एसीबीने सांगितलं होतं. आता त्याच चौकशीसाठी एसीबीने ही नोटीस धाडली आहे. त्यानुसार भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार शिवसेनेचा एक तर भाजप संलग्न अपक्ष एक अशा पंधरा नगरसेवकांचा समावेश आहे.
कोरोना संदर्भात राज्यात दिलासादायक परिस्थिती, सर्व जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली
कोरोना संदर्भात राज्यात दिलासादायक परिस्थिती आहे. सध्या राज्यातील सर्व जिल्हे हे पाच टक्के पॉझिटिव्हिटी रेटच्या खाली गेल्याची माहिती आरोग्य विभागाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. सध्या राज्यात तिसरी लाट संदर्भातली परिस्थिती नाही मात्र गणेशोत्सव काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे त्यामुळे काही दिवस काळजी घ्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे.
ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
ठाण्याकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम झासा आहे. माजिवाडा परिसर ते कोपरी पूल रस्त्यावर संपूर्ण वाहतूक कोंडी आहे. घोडबंदर रोड, नाशिक रोड, भिवंडी बायपास वाहतूक कोंडी आहे.
ठाण्यात खड्ड्यांमुळे दुपारपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी, १५ मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड ते दोन तासाचा कालावधी लागत आहे