Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
Maharashtra Politics big breaking news: एकनाथ शिंदे हे अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला तयार झाले आहेत. ते आझाद मैदानावर आज फडणवीसांसोबत शपथ घेतील.
मुंबई: महायुती सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही, यावरुन निर्माण झालेला सस्पेन्स अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मनधरणीला अखेर यश आले असून एकनाथ शिंदे हे गुरुवारी आझाद मैदानावर होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला तयार झाले आहेत. त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही त्रिमूर्ती शपथग्रहण करेल. यापैकी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करतील.
एकनाथ शिंदे हे गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीवर एकप्रकारची टांगती तलवार होती. या शपथविधी सोहळ्यात फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच शपथ घेतात की काय, अशी चिन्हं दिसत होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी आपला सर्व राजकीय मुत्सद्दीपणा पणाला लावून एकनाथ शिंदे यांना आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास राजी केल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदाबाबत निर्णय झाल्याशिवाय मंत्रिमंडळात सहभागी व्हायला तयार नव्हते. मात्र, तुमच्या मागणीचा सकारात्मकदृष्टीने विचार केला जाईल. पण तुम्ही आझाद मैदानावर आमच्यासोबत शपथ घ्या, अशी गळ देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना घातली होती.
आझाद मैदानावर फक्त मी आणि अजित पवार यांनीच शपथ घेतली, तर ते चांगलं दिसणार नाही. आपण अडीच वर्षे एकत्र काम केले आहे. आपल्या मागण्यांवर भाजपच्या वरिष्ठाकंडून विचार केला जात आहे. पण तुम्ही आजच्या शपथविधीत सहभागी व्हा, असे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितले. भाजप अद्याप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास राजी झाली नसली तरी शिंदेच्या प्रेशर गेममुळे आता भाजपकडून महसूल हे महत्त्वाचे खाते शिवसेनेला सोडले जाऊ शकते, अशी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी वर्षा बंगल्यावर दोनवेळा बैठक झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना, मी तुमच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार असल्याचे सांगितले. पण आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाला बळ देण्यात यावे, अशी अट एकनाथ शिंदे यांनी घातली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी, महायुतीमध्ये कोणालाही साईड कॉर्नर केले जाणार नाही. आपल्याला एकत्र राहायचे आहे , सर्वांना घेऊन पुढे जायचे आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचे समजते.
आणखी वाचा
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?