Breaking News LIVE : एनआयएची टीम मुकेश अंबानींच्या घराबाहेर दाखल, सचिन वाझेंसोबत घटनेचं नाट्यरुपांतर
Breaking News LIVE Updates, 19 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Petrol and Diesel price | सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर, कोणतीही दरवाढ नाही
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग 20 व्या दिवशी स्थिर राहिल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना देशात आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत हे विशेष. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47 रुपये इतकी आहे.
Remdesivir : फक्त बाराशे रुपयात रेमडीसिवीर इंजेक्शन, ठाणे पालिकेचा निर्णय
ठाण्यात कोरोनाची संख्या वाढत असतानाच ठाणे महानगर पालिका कोरोनाच्या लढाईसाठी सुसज्ज होते आहे. ठाणेकरांना Covid-19 वर परिणामकारक असलेल्या Remdesivir - 100 mg हे इंजेक्शन आता अवघ्या 1200 रुपयांपेक्षा कमी दारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे Remdesivir - 100 mgइंजेक्शनसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.
Mumbai Corona Cases : एकवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही रुग्णसंख्यावाढीचा वेग!
राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठलाय. सोबतच, मुंबईत एकेवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही आता रुग्णसंख्यावाढीनं वेग घेतलाय. धारावीमध्ये कोरोनाला नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आले असले तरी पुन्हा पुन्हा एकदा या आजाराने उचल खाल्लेली पाहायला मिळत आहे. काल या भागात तब्बल 30 रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी 33 रुग्ण आणि त्यापूर्वी 1 जून रोजी 34 रुग्ण समोर आले होते. परंतु त्यानंतर या भागातील रुग्ण संख्या एकेरी आकड्यात आली होती.
'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको' सचिन वाझे यांची कोर्टात नवी याचिका
आपल्या वकिलांशी बोलताना एनआयए अधिकाऱ्यांची तिथं उपस्थिती नको, अशी नवी मागणी सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात ही नव्यानं याचिका दाखल केली आहे.
एनआयएची टीम मुकेश अंबानींच्या घराबाहेर दाखल, सचिन वाझेंसोबत घटनेचं नाट्यरुपांतर
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ उभी होती, तिथे एनआयएची टीम दाखल, एनआयएकडून संपूर्ण घटनेचं नाट्यरुपांतर केलं जाणार, सचिन वाझेही उपस्थित
वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती
महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. या पदासाठी उपसचिव दर्जाचा मुस्लीम अधिकारी पात्र ठरतो. यासाठी वक्फ बोर्डासमोर संदेश तडवी आणि अनिस शेख यांची नावे आली होती. यापैकी संदेश तडवी यांनी या नियुक्तीस नकार दिला. त्यामुळे उर्वरित उमेदवार अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या मान्यतेनंतर या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे.
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय
कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुध्दा कोरोनाची एन्ट्री झाली. असून 18 शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 7 शिक्षकही कोरोना बाधित झाले आहेत. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत 5 ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 336 कोरोना रुग्ण
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 336 कोरोना रुग्ण आढळले. आज 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 44 हजार 558 वर.
सांगलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आज दिवसभरात 186 नवीन कोरोना बाधितांची नोंद
सांगली : जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्ण संख्या लागली वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. आज 186 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रात एकूण 59 रुग्ण आढळून आले आहेत.