Ganeshotsav 2022 : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रीम तलावात विसर्जन करणं बंधनकारक, महापालिका प्रशासनाचा आदेश
BMC Guidlines on Ganeshotsav 2022 : गणेश मूर्ती जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर त्यावर तसं नमूद करणं बंधनकारक असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे.
मुंबई: यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने काही सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. यंदा कोविड कालावधीनंतर होणाऱ्या यंदाच्या गणेशोत्सवासाठी विशेष बाब म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे. पण 2023 पासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर बंदी आणण्यात येणार आहे.
मूर्तींवर पीओपीची नोंद असायला हवी
यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर ती मूर्ती पीओपीची असल्याचे नमूद करणे आवश्यक आहे. जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणाऱ्याना प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल. या मूर्त्यांचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन न करता त्यांचे कृत्रीम तलावात विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
पुढच्या वर्षीपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी
यंदाच्या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली असली तरी पुढच्या वर्षीपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यावर पूर्णतः प्रतिबंध असणार घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्य गणेश मूर्तींचीच खरेदी आणि विक्री करणे बंधनकारक असणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य शासनाच्या काही सूचना
- यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने साजरे व्हावेत. हे करताना मंडळांनी समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे.
- गणेशोत्सव, दही हंडी, मोहरम या सणाच्या काळांत राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील यादृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनांना निर्देश.
- गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत.
- गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क नाही. हमी पत्र देखील न घेण्याचे निर्देश.
- गणेसोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारचे परवानग्या मिळाल्या पाहिजेत.
- गणेशोत्सव हा सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र नियमांचा अवास्तव बाऊ केला जाऊ नये.
- राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवावी.
- मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणं तसेच विसर्जन मार्गांवर पुरेशी वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी.
- मूर्तीच्या उंचीवरची बंधने आपण उठवली आहेत.
- मुंबईत मूर्तीकारांसाठी मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यात याव्यात. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात.
- पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल.
- गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी पुरस्कार योजना सुरु करण्यात येईल.
- धर्मादाय आयुक्तांनी मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी.
- गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी.
- दहीहंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (14 वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.