मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त 45 गावांसाठी यंदा काळी दिवाळी
दिवाळीत नवीन कपडे, गोडधोड पदार्थ आणि फटाके त्यामुळे बच्चे कंपनीसाठी मज्जा असते. मात्र या भीषण दुष्काळात पैसेच नसल्याने लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच गायब झाला आहे.
पंढरपूर : देशभरात दिवाळी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी होत आहे. दुसरीकडे भीषण दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील 45 गावांची यंदाची दिवाळी काळी झाली. या गावांमध्ये आकाशकंदील सोडा साधी पणती देखील पेटलेली नाही.
संपूर्ण पावसावर अवलंबून असणाऱ्या या गावांना दुष्काळ नवीन नाही. मात्र यंदा या दुष्काळाची दाहकता इतकी तीव्र बनली की शेतात पेरलेले देखील शिल्लक न राहिल्याने जगायचे कसे? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतात पीक नाही, प्यायला पाणी नाही, हाताला काम नाही, त्यामुळे खिशात दमडी नाही अशा अवस्थेतील या गावांतील नागरिकांसाठी यंदाची दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे.
दिवाळीत नवीन कपडे, गोडधोड पदार्थ आणि फटाके त्यामुळे बच्चे कंपनीसाठी मज्जा असते. मात्र या भीषण दुष्काळात पैसेच नसल्याने लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच गायब झाला आहे. घरात फराळाचे पदार्थ करायला बाजारच केला नाही, त्यामुळे या गावांतील लहान मुलांसाठीही यंदाची दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे.अशा भीषण परिस्थितीत मुलांची समजूत काढताना आई-वडिलांच्या पोटालाही पीळ पडत आहे. मात्र परिस्थितीच इतकी भीषण बनल्याने त्यांचाही नाईलाज आहे. काहींच्या घराची वीज सुद्धा बिल न भरल्याने तोडल्याने दिव्यांच्या सणात त्यांच्या घरी काळोखाचे साम्राज्य आहे.
गावांतील विहिरी कोरड्या पडल्याने रहिवाशांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याला शेतात गवत शिल्लक न राहिल्याने चाऱ्याविना हंबरणारी जनावरे सांभाळणे अवघड बनले आहे. त्यामुळे त्यांना खाटीकखान्याची वाट दाखवायची वेळ येऊ लागली आहे.
सध्या सगळीकडे दिवाळीचा झगमगाट सुरु असताना लोकांनी अशा भीषण दुष्काळी भागात रोज जगण्यासाठी धडपड करीत असलेल्या बळीराजाचा विचार करण्याची वेळ आली आहे.