(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्ली निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मिशन कमळ? शिवसेना की राष्ट्रवादीसोबत जायचं यावरुन मतभेद?
दिल्ली निवडणुकीनंतर भाजप नेतृत्वाच्या टार्गेटवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही राज्यातील गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी 'मिशन कमळ' पुन्हा सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद अशा सर्व शक्तींचा वापर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : दिल्ली निवडणुकीनंतर भाजप नेतृत्वाच्या टार्गेटवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही राज्यातील गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी 'मिशन कमळ' पुन्हा सक्रिय होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासाठी भाजप साम, दाम, दंड, भेद अशा सर्व शक्तींचा वापर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्रात पर्याय काय यावरून प्रदेश भाजपात दोन मतप्रवाह असल्याचं सांगितलं जात आहे.
सत्तेसाठी नाराज आमदारांची फोडाफोडी करून बहुमताचा आकडा गाठणं कठीण आहे. राज्यात मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची सध्यातरी कोणाची मनःस्थिती नाही. मग पर्याय उरतो तो एकतर शिवसेनेला सोबत घेण्याचा किंवा राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करण्याचा. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेला पुन्हा चुचकरण्यासाठी केंद्रीय नेतृत्व बिलकुल राजी नाही. तर राष्ट्रवादीसोबत जाण्यास प्रदेश भाजपमध्ये मतभेद आहेत.
महाराष्ट्रातील 'मिशन कमळ' यशस्वी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व राष्ट्रवादीचा हात धरायला तयार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेऊन या शक्यतेवर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र राज्यात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जात आहे.
खरंतर भाजप-राष्ट्रवादी छुप्या युतीच्या हालचाली 2014 च्या निवडणुकीनंतरच सुरु झाल्याची माहिती आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. यासाठी केंद्रात अमित शाह आणि शरद पवार यांच्यात, तर राज्यात सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह बैठका पार पडल्या होत्या. इतकंच काय तर मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचं सूत्रही ठरलं होतं. पण ऐन वेळेस शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी राज्यातील नेत्यांनी दबाव वाढवला आणि सगळं फिस्कटलं, असं बोलंल जातं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने दिलेल्या जोरदार झटक्यातून सावरत भाजपात आता सत्ता हस्तगत करण्याच्या सर्व पर्यायांवर खलबतं सुरू आहेत. यासाठी प्रदेशच्या कोअर कमिटीच्या बैठकीत एकमताने ठराव केला जाणार आहे. राष्ट्रवादीसोबत न जाण्यासाठी विरोधी गट दबाव आणण्यासाठी सक्रिय झालेला आहे.
काय आहे पक्षीय बलाबल ?
भाजप - 105 रासप - 1 अपक्ष - 13
शिवसेना - 56 राष्ट्रवादी काँग्रेस - 54 काँग्रेस - 44 बविआ - 3 सपा - 2 प्रहार जनशक्ती - 2 शेकाप - 1 स्वाभिमानी - 1 जनसुराज्य शक्ती - 1 क्रांतिकारी शक्ती - 1
मनसे - 1 माकप - 1 एमआयएम - 2
संबंधित बातम्या