Chandrakant Bawankule : बावळकुळेंनी युतीच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला सांगितला, पण सुधीर मुनगंटीवारांकडून सारवासारव! दादा भुसेही बोलले
भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला.
Chandrakant Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या होत्या. बावनकुळे यांनी थेट केलेल्या वक्तव्यानंतर वाद होणार असे दिसताच त्यांचा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. यानंतर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे.मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही कृषी मंत्री दादा भुसे यांनीही अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. 48 ते 50 जागांपुरतीच शिवसेनेची ताकद नसून विचारविनिमय करुन निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर सारवासारव
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता भाजपकडून सारवासारव केली जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील 2024 च्या विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. माझ्या कानावर असं काही आलेलं नाही. बावनकुळे काय बोलले मला माहित नाही. जागा वाटप संदर्भात दोन्ही पक्षाच्या कोअर कमिटीत निर्णय होईल, जागावाटपाचा फार्म्युला त्या त्या पक्षाच्या क्षमतेवर ठरेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दादा भुसे काय म्हणाले?
जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 48 आणि 50 पुरतीच शिवसेनेची शक्ती नाही. विचारविनिमय करुन निर्णय होईल, असं दादा भुसे यांनी सांगितलं..
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत मोठे वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युल्याबाबत जागावाटप सांगितलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी भाजप 240 जागा लढवणार तर 48 जागा शिवसेनेला देणार असल्याचे सांगितलं. त्यानंतर बावनकुळेंच्या वक्तव्याने युतीत वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला आहे.
वाद निर्माण झाल्यानंतर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण
दरम्यान, जागावाटपाच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर बावनकुळेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, "त्या व्हिडिओमधील अर्धाच भाग दाखवण्यात आला. शिवसेना आणि भाजप 288 जागा युतीत लढणार आहे. आमचे एनडीए घटक पक्षही असतील. राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही 200 जागा आम्ही जिंकणार आहोत. पूर्वी युतीला मिळाल्या नाही, तेवढं मोठं बहुमत आम्हाला मिळेल. त्याच्या तयारीची आमची बैठक होती. विपर्यास करुन क्लिप दाखवण्यात आली."
जागावाटपाबाबत निर्णय ठरलेला नाही
त्यांनी पुढे सांगितले की, "अजून कोणताही फॉर्म्युला जागावाटपाबाबत ठरलेला नाही. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व ठरवेल. तयारी पूर्ण तयारी करावी लागेल. शिंदेंच्या तयारीचा फायदा भाजपला होईल आणि भाजपची तयारी शिंदे यांच्या कामी येईल. धनुष्यबाण-कमळ ही युती घट्ट आहे."
इतर महत्वाच्या बातम्या