अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिकांचा का नाही? नितेश राणे यांचा प्रश्न
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांचा राजीनामा घेतला. परंतु, नवाब मलिक यांच्यावर त्यापेक्षा गंभीर आरोप असूनही त्यांचा राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
Nitesh Rane : "माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा शरद पवार यांनी लगेच घेतला. मग नवाब मलिक यांना तो न्याय का नाही? अनिल देशमुख हे हिंदु मराठा आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय केला का? अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. परंतु, नवाब मलिक यांच्यावर त्यापेक्षा गंभीर आरोप आहेत. मग मलिक यांचा शरद पवार यांनी राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नितेश राणे म्हणाले, "आपल्याला 1993 चा काळ चांगला आठवत असेल. त्यावेळी हिंदुहृदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे, भाजप आणि आरएसएस नसते तर हिंदुत्वाचा विचार टिकला नसता. 1993 च्या बॉम्बस्फोटचे क्षण कुणाला आठवत असतील तर ते सांगू शकतील की, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांचा राजिनामा का आवश्यक आहे? दाऊद सारख्या अंडरवर्ल्डला मदत करणारे लोक लाल दिव्याच्या गाडीत आपल्या आजूबाजूला फिरले तर आपण सुरक्षित राहू का? असा प्रश्न यावेळी आमदार राणे यांनी उपस्थित केला.
...'तर आम्ही नवाब मलिक यांच्या कानफटीत मारली असती'
"पोलीस हतबल आहेत. दाऊद बरोबर फिरणाऱ्यांना त्यांना सलाम ठोकावा लागतो. ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक कसे हातवारे करत होते. पोलिसांना थोडं बाजूला ठेवलं असतं तर आम्हीच नवाब मलिक यांच्या कानफटीत मारली असती, असं वक्तव्य राणे यांनी यावेळी केलं.
'महानगरपालिका निवडणुकीचे युद्ध जिंकायचे आहे'
"मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता का गरजेची आहे? हे लोकांना समजावून सांगा. मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे काम करायचे आहे. भाजपचा झेंडा मुंबईच्या अस्तित्वासाठी महत्वाचा असून महानगरपालिका निवडणुकीचे युद्ध जिंकायचे आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
'देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसंम्राट ही पदवी द्यावी'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसंम्राट ही पदवी द्यायला पाहिजे असे मत नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले. "आपण देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुहृदयसंम्राट ही पदवी कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यायाला पाहिजे, असे मत नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian Case : मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं : नारायण राणे
- Disha Salian : दिशा सालियनने आत्महत्या का केली? आई-वडिलांनी स्पष्टच सांगितले
- Chandrakant Patil : दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- 'खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे', नितेश राणेंचं ट्वीट; आज राणे पितापुत्र चौकशीसाठी हजर राहणार