(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकारने शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याऐवजी चिंताग्रस्त केलं, गिरीश महाजनांची टीका
महाविकास आघाडी सरकारने अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली. यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
जळगाव : भाजप नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. नव्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची नुसती घोषणा केली, मात्र शेतकऱ्यांना कुठलीही मदत अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने गरज असताना सरकारकडून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून अनेक कामं रखडली आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करु, अशी घोषणा देत महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून अद्यापपर्यंत कर्जमाफीची रक्कम आणि दुष्काळ निधीची मदत शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.
शेतकरी अडचणीत असताना त्यांना तात्काळ मदत मिळणे अपेक्षित होतं. शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडला होता. त्यावेळी शेताच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी 25 हजारांची मदत करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेल्या 8 हजारांच्या मदतीव्यतिरिक्त कोणतीच मदत या सरकारने शेतकऱ्यांना केलेली नाही. सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीची नुसती घोषणा दिली गेली आहे, असं गिरीश महाजनांनी सांगितलं.
लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
यात भर म्हणून या सरकारच्या काळात विजेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग सुरु झाल्याने शेतकरी अधिक अडचणीत आला आहे. गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांना विजेसाठी झगडावं लागलं नाही. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यात विजेचा प्रश्न खुप गंभीर झाला आहे. त्यामुळे विजेअभावी शेतकऱ्यांना रबी पिकांना, बागायती पिकांना, फळबागांना पाणी भरता येत नाही. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याची घोषणा करणारं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करत असल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
जनसामान्यांच्या अशाच प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी देखील बीडमध्ये आंदोलन केलं. राज्यभर शेतकऱ्यांनच्या विषयावर आम्हाला आंदोलन करावं लागेल. विजेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी यासाठी राज्यातील विविध भागात आम्हाला आंदोलनं करावी लागतील, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला आहे.