Jalgaon News : मुक्ताईनगरमध्ये गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट, चर्चांना उधाण
Jalgaon News : जळगावात भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
जळगाव : राज्यभरात एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दुसरीकडे जळगावात मात्र भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारी (9 मे) संध्याकाळच्या सुमारास गिरीश महाजन हे अचानक चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताईनगर इथल्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांनीही ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात, तर दुसरीकडे भाजप नेते गिरीश महाजन यांना राजकीय जीवनात आपण लहानचं मोठं केलं असताना त्यांनी मात्र माझं राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी अनेक वेळा केला आहे.
सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय आखाडा बघायला मिळत असला तरी एकनाथ खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांच्याविरोधात एकत्र राहून त्यांना शह देण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये छुपी युती असल्याचं एकनाथ खडसे यांनी अनेक वेळा म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे येणारा काळ ठरवणार असला तरी भाजप नेते आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील हे काहीनाकाही निमित्ताने सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याने खडसे यांच्या दाव्याला पुष्टी मिळत असल्याचं पाहायला मिळतं.
मध्य प्रदेशातील भाजप खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने मुक्ताईनगरहून बऱ्हाणपूर इथे जात असताना, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घराच्या समोरुनच जावं लागणार असल्याने, पाटील यांनी दहा मिनिटं चहा-पाणी करुनच जावं, असा आग्रह केला. त्यामुळे त्यांच्या घरी चहा-पाणी घेण्यासाठी आपण गेलो होतो. यावेळी कोणत्याही प्रकारचा राजकीय विषय झाला नाही. आमदार चंद्रकांत पाटील आणि माझे गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यात आमच्या दोघांना खडसे राजकीय वैरी मानत असल्याने आमच्यात अधिकचे दृढ संबंध निर्माण झाले आहेत, ते आम्ही लपून ठेवलले नाहीत.
त्यामुळे आमच्या आजच्या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. ती सदिच्छा भेट आहे, असा दावा गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी केला.