एक्स्प्लोर
Advertisement
भाजप हीच खरी 'गॅंग ऑफ वासेपूर'! राधाकृष्ण विखे पाटील
भाजपमध्ये गुंडांना कसा राजाश्रय मिळतो, हे भाजपचेच आमदार जाहीरपणे सांगत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.
मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्षाला 'गॅंग ऑफ वासेपूर'ची उपमा देऊ केली होती. पण भारतीय जनता पक्ष हीच महाराष्ट्रातील खरी 'गॅंग ऑफ वासेपूर' आहे. कारण भाजपमध्ये गुंडांना कसा राजाश्रय मिळतो, हे भाजपचेच आमदार जाहीरपणे सांगत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.
यावेळी विखे पाटील म्हणाले की, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी सरकारला 'ठग ऑफ महाराष्ट्र'ची उपमा दिली होती. ही उपमा या सरकारने मागील 4 वर्ष सार्थ ठरवली आहे. औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन, सामाजिक न्यायाच्या योजना अशा प्रत्येक आघाडीवर या सरकारने केवळ ठगबाजीच केली. त्यामुळे लोकांना सोप्या शब्दांत कळेल, अशा भाषेत आम्ही सरकारला 'ठग ऑफ महाराष्ट्र'ची उपमा दिल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा 'इव्हेंट'
विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा एक 'इव्हेंट' असल्याचा ठपका ठेवला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपला 'निर्लज्ज' संबोधले. तरीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला माफ केले. ही मुख्यमंत्र्यांची सहिष्णूता आहे का? अशी बोचरा सवालही त्यांनी विचारला. भाजपला शक्य नसेल तर मी अयोध्येत जाऊन मंदिर बांधतो, अशी वल्गना करून उद्धव ठाकरे अयोध्येला गेले. लोकांना वाटले, आता ते मंदिर बांधूनच परतणार! पण उद्धव ठाकरे केवळ शरयूच्या तिरावर आरती करुन आणि सभास्थानाचे भूमिपूजन करून मुंबईत परतले. आरती झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्या खिशातील राजीनाम्याच्या होड्या शरयू नदीत सोडल्या, अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.
सनातनबाबत सरकारची मवाळ भूमिका
सनातन व इतर कट्टरवादी संघटनांबाबत सरकार जाणीवपूर्वक मवाळ भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गेल्या 12 नोव्हेंबरला सीबीआयने पुण्याच्या न्यायालयात सादर केलेल्या दस्तावेजामध्ये सनातन संस्थेच्या कारवायांचे स्वरूप दहशतवादी कारवायांसारखीच असल्याचे नमूद केले आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने 23 नोव्हेंबरला बंगळुरू येथील न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध असल्याचे नमूद आहे. सनातनसंदर्भात काही पुरावे देखील त्यांनी सादर केले आहेत. या पश्चातही सरकार सनातनवर कारवाई का करीत नाही? असा संतप्त सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
पोलिसांच्या विशेष पथकाने 5 सप्टेंबर 2016 रोजी पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर टाकलेल्या धाडीत गुंगीची औषधे सापडली होती. 2013 ते 2016 या काळात या आश्रमातून 15 हजार गुंगीच्या गोळ्यांची खरेदी झाली आहे. हे औषध सनातन आश्रम कशासाठी विकत घेतो? असा प्रश्न करून या प्रकरणात सनातनविरूद्ध सौम्य स्वरूपाची कारवाई केली गेल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला.
भिडे गुरूजींवरील गुन्हे माफ करताना सारे नियम धाब्यावर
भिडे गुरूजींनाही सरकार पाठिशी घालत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. भिडे गुरूजींवरील काही गुन्हे नुकतेच सरकारने माफ केले. ते गुन्हे माफ करताना सारे नियम धाब्यावर बसवल्याचे जाहीर आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केले आहेत. राजकीय किंवा सामाजिक आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याच्या धोरणाचा भिडे गुरूजींसारख्या व्यक्तीला लाभ देणे, हा त्या धोरणाचा गैरवापर आहे. भिडे गुरूजींना कायद्याची तमा नाही. ते कायदा जुमानत नाही. आंबे खाऊन मूल होण्याबाबत नाशिकमध्ये दाखल खटल्याला हजर राहण्याचे सौजन्य ते दाखवत नाहीत. कायद्याचा असा अनादर करणाऱ्या व्यक्तीचे गुन्हे माफ का झाले? असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
बॉलीवूड
Advertisement