Raju Shetti on Murlidhar Mohol: मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी; राजू शेट्टींचा पलटवार
पुण्यातील जागेवरून राजू शेट्टी यांनी 3 हजार कोटींची जागा 230 कोटीत हडपडल्याचा गंभीर आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला आहे. शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनीही मोहोळांवर आरोपांची मालिका केली आहे.

Raju Shetti on Murlidhar Mohol: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पलटवार केला आहे. मी नुरा कुस्ती खेळतो की पट काढून कसा चितपट करतो याची माहिती मोहोळ अण्णांनी त्यांच्या राजकीय वस्तादांकडून घ्यावी, असे म्हणत राजू शेट्टी यांनी मोहोळ यांच्या नुरा कुस्तीवरुन पलटवार केला. मोहोळ यांनी जागा प्रकरणात हात झटकल्यानंतर राजू शेट्टी यांनी जागेच्या विक्रीसंदर्भात घटनाक्रम सांगत मोहोळ यांना पुन्हा आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पुण्यातील जागेवरून राजू शेट्टी यांनी 3 हजार कोटींची जागा 230 कोटीत हडपडल्याचा गंभीर आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांनीही मोहोळांवर आरोपांची मालिका केली आहे.
धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली हेच गौडबंगाल
राजू शेट्टी यांनी आज मोहोळ यांनी केलेल्या टीकेनंतर प्रत्युत्तर दिले. राजू शेट्टी म्हणाले की, मी माहिती न घेताच एचएनजी बोर्डिंगच्या संदर्भात वक्तव्य केली आणि मी नुरा कुस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केले. मुरलीधर अण्णांच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आठ सप्टेंबरला जैन बोर्डिंगची जागा विकायची त्या संदर्भात जो साठेखत झालं होतं त्या संदर्भात हरकत घेणारे पत्र पुणे महापालिका आयुक्त, धर्मादाय आयुक्त, गोखले कंपनी आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्यांना पाठवलेलं होतं, कारण मुळामध्ये हा जो एचएनजी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या उपनियमांप्रमाणे संस्थेची मालमत्ता विकायचा अधिकार कोणालाही नाही. असं असताना धर्मादायुक्तांनी खरं तर या ही जागा विकायला परवानगी दिली हेच मोठं गौडबंगाल आहे. 13 फेब्रुवारीला मालमत्ता विकण्याच्या संदर्भात ट्रस्टचा अर्ज जातो. त्यानंतर लगेच दीड महिन्याच्या आत धर्मादाय आयुक्त त्याला परवानगी देतात. त्याआधी ते उपनियम, आर्थिक स्थिती तपासत नाही. 31 मार्च 2025 पर्यंत ट्रस्टकडे आठ कोटी रुपये शिल्लक होते, तरीसुद्धा आर्थिक अडचणीमुळे आम्ही जागा विकत होतो असं ते म्हणत असतील, तर त्यावर विश्वास ठेवायचा? अशी विचारणा त्यांनी केली.
एकाच दिवशी गहाण आणि खरेदीखत
ते पुढे म्हणाले की, विश्वस्त चकोर गांधी यादी 5 ऑक्टोबरला राजीनामा दिला आणि त्यांनी हे सांगितलं की माझी दिशाभूल केली गेली. आम्हाला दूरध्वनीवरून म्हणजे बैठक तर झाली नाही. आम्हाला सांगितलं की जागा विकसित करायची आहे. प्रत्यक्षात माझी दिशाभूल करून सही घेतली. त्यामुळे 6 ऑक्टोबरपासून मी या पदावर नाही इथून पुढे होणाऱ्या कुठल्याही निर्णयास मी बांधील नाही असं लिहून त्यांनी राजीनामा दिला आहे. 8 ऑक्टोबरला खरेदीखत झालं आहे, त्याच दिवशी गहाणखत झालं आहे. बुलढाणा अर्बन बँकेनं त्याच दिवशी 20 कोटी रुपये तसेच भिडेश्वर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीनं 50 कोटी रुपये कर्ज दिलं. गहाणखत आणि खरेदी खत त्याच दिवशी एवढ्या जलद गतीने झाले. योगायोग असा आहे की या विक्रीला परवानगी देणारे जे धर्मादाय आयुक्त कलोटी आहेत हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. ते हजर झाल्यानंतर आठवड्याच्या आत जागा विक्रीचा अर्ज जातो, त्यानंतर दीड महिन्याच्या आत ते परवानगी देतात.
माझा काही संबंध नाही असे सांगून हात वर केले
ते म्हणाले की, भिडेश्वर सोसायटी आहे ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अण्णासाहेब जोल्लेंच्या अध्यक्षतेखाली आहे. त्यांच्या पत्नी आता कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार आहेत. मुरलीधर अण्णा म्हणतात की मी राजीनामा दिला आहे. परंतु, देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना लाभाच्या पदावर राहता येत नाही, यासाठी त्यांनी राजीनामा दिला हे हे साऱ्यांना माहित आहे, पण ते सांगतात की या संस्थेचा माझा काही संबंध नाही. तेव्हा वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी गोखले कंपनी आणि माझा काही संबंध नाही असे सांगून हात वर केले. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी चव्हाट्यावर आणाव्या लागल्या. आमचा आणि मुरलीधर मोहोळ यांचे काही भांडण नाही, मुख्यमंत्र्यांशी काही भांडण नाही. परंतु, इतर कुठेतरी मुख्यमंत्र्यांचे नाव यायला लागलं आहे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव घ्यायला लागलं आहे. त्यांचा खरोखर जर हात नसेल तर दोघांनी पुढाकार घेऊन विशेषाधिकार वापरून व्यवहार रद्द करावा, आमचा वाद संपून जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या
























