श्रीराम मंदिर निधी संकलनाच्या आडून राज्यात भाजपच संपर्क अभियान?
देशभरात 4 लाख गावापर्यंत पोहचून 11 कोटी कुटुंबात जाऊन निधी संकलन करण्याचे नियोजन आहे. यासाठी राज्यात 5 लाखांपेक्षा अधिक रामसेवक तयार करण्यात आलेत.
जालना : अयोध्येतील प्रसिद्ध श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीच्या वतीने देशभर निधी संकलन केले जाणार आहे. येत्या 15 जानेवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत देशभर हे निधी संकलन केले जाणार आहे. राज्यात देखील या निधी संकलनाला 15 तारखेपासून सुरुवात होईल. या निधी संकलना आडून राज्यात भाजपने 1 कोटी 40 लाख कुटुंबापर्यंत पोहचण्याची तयारी केली आहे. यासाठी राज्यात 5 लाखांपेक्षा अधिक रामसेवक तयार करण्यात आलेत.
राम मंदिराच्या नावाने जनाधार वाढवण्याचा संकल्प?
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचा आरोप करत राममंदिराचे श्रेय घेऊन राज्यात ठिकठिकाणी निधी संकलनाच्या नावाखाली भाजप कार्यकर्ते पक्षीय प्रचार करताना पाहायला मिळत आहे. यासाठी राज्य पातळीवरून ग्रामपंचायतीपर्यंत वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या तोंडावर प्रचारातही राम मंदिराचा मुद्दा हायलाईट होणार, नागपूर येथे विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांनी विदर्भातील भाजप जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना निधी संकलनाच्या पावती पुस्तकांचे वाटप करण्यात आलं आहे. राममंदिराच्या उभारणीसाठी विदर्भातून जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते सरसावले असल्याच चित्र पाहायला मिळत आहे.
अयोध्येतील राममंदिरासाठी वर्गणी की राजकीय प्रचार? भाजप-शिवसेना पुन्हा आमने-सामने
देशभरात 4 लाख गावापर्यंत पोहचून 11 कोटी कुटुंबात जाऊन निधी संकलन करण्याचे नियोजन आहे. राममंदिर उभारणीसाठी देशातील प्रत्येक घटकाचा सहभाग व्हावा या उद्देशाने 10 रुपये 100 रुपये आणि 1000 हजार रुपये असे कूपन तयार करून त्या माध्यमातून हे निधी संकलन होणार आहे. दरम्यान या माध्यमातून नियोजन करून भाजप पक्षाचा प्रचार प्रसारासाठी या माध्यमातून घरोघरी पोहोचणार आहे. या संपर्क अभियानात नियोजित राममंदिराचे चित्र घेऊन राज्यात शहर, गाव, वाड्या वस्त्यावरील 1 कोटी 40 लाख कुटुंबापर्यंत पोहचण्याचा संकल्प आहे.
राममंदिर उभारणीसाठी 10 अब्ज रुपयांचा निधी गोळा करणार, विश्व हिंदू परिषदेचा संकल्प
सर्वोच्च न्यायालाच्या निकालानंतर राममंदिर उभारणीच्या मुद्दा निकाली काढला असला तरी या भावनिक मुद्द्याचे श्रेय घेत भाजप राममंदिराचा मुद्दा जिवंत ठेऊ इच्छित आहे. ज्यातून जास्तीत जास्त जनाधार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील या मुद्याचा अधिकाधिक प्रचार करण्यात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा प्रयत्न राहणार आहे असे दिसत आहे.