Ram Mandir | राममंदिर उभारणीसाठी 10 अब्ज रुपयांचा निधी गोळा करणार, विश्व हिंदू परिषदेचा संकल्प
राममंदिर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आवश्यक आहे. त्यासाठी गावागावातील 10 कोटी कुटुंबियांना संपर्क करून हे 10 अब्ज रुपये विश्व हिंदू परिषद मंदिर निर्मितीसाठी गोळा करायचं नियोजन आखत आहे.
नागूपर : अयोध्येतील राममंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे. त्यानंतर आता राममंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. राममंदिर उभारणीसाठी क्राऊड फंडिंगद्वारे (लोकांकडून वर्गणी काढून) 10 अब्ज रुपये जमा करण्याचा विचार विश्वहिंदू परिषद करत आहे. अयोध्येतील भव्य आणि महत्त्वाकांक्षी राम मंदिराच्या निर्मितीला हा एवढा पैसा उभा करण्याच संकल्प विश्व हिंदू परिषदेचा आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1000 वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे.
राममंदिर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आवश्यक आहे. त्यासाठी गावागावातील 10 कोटी कुटुंबियांना संपर्क करून हे 10 अब्ज रुपये विश्व हिंदू परिषद मंदिर निर्मितीसाठी गोळा करायचं नियोजन आखत आहे. एवढा पैसा उभा करण्यासाठी एका विशेष संपर्क अभियानाची आखणीही होत आहे.
संपर्क प्लान
एकूण 4 लाख गावांमधील 10 कोटी कुटुंबियांशी संपर्क विश्व हिंदू परिषदेकडून साधला जाणार आहे. या प्रत्येक कुटुंबाकडून वर्गणी रुपाने 100 रुपये राममंदिराच्या उभारणीसाठी घेतले जाणार आहे. हे नियोजन यशस्वी ठरल्यास एकूण 10 अब्ज रुपयांची उभारणी होऊ शकते.
जेव्हा राम मंदिरासाठी शिलादान झाले होते, त्यावेळी 3 लाख गावातून पूजन करत शीला अयोध्येत पोहचल्या होत्या. तेव्हा विश्व हिंदू परिषदेने 1 व्यक्ती सव्वा रुपया आणि एक गाव, एक वीट असे ध्येय ठेवले होते. लोक सहभागातून मंदिर उभारणी ही काही भारतासाठी नवीन संकल्पना नाही. मात्र सध्या कोविडची साथ बघता संपर्क करणे अवघड होऊन बसले आहे. साथीची भीती संपल्यावरच लोक संपर्क अभियान राबवले जाणार असल्याचे कळते.