चंद्रकांतदादांच्या पत्राने गडकरींची अडचण? पत्राला पक्षांतर्गत राजकारणाचे कंगोरे असल्याची चर्चा
राज्यातील 30 साखर कारखान्यांची चौकशी करावी अशा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटलांनी अमित शाह यांना लिहिलंय. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसमोरील अडचण वाढल्याची चर्चा आहे.
मुंबई : कमी किंमतीत विक्रीस काढलेल्या राज्यातील 30 सहकारी साखर कारखान्यांची चौकशी करावी अशा आशयाचे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. चंद्रकांत पाटलांनी ज्या कारखान्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या दोन कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपल्याच केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे का याची चर्चा रंगली आहे.
साताऱ्याच्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीने चौकशी सुरु केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये अशा प्रकारच्या लिलावातून कमी किंमतीला खरेदी करण्यात आलेल्या राज्यातील 30 साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
वैनगंगा आणि महात्मा या दोन साखर कारखान्यांवर नितीन गडकरींचे चिरंजीव संचालक म्हणून काम पाहतात. या दोन कारखान्यांची खरेदी ही पूर्ती कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली होती. हा व्यवहार 2009-10 साली झाला असून नितीन गडकरींचे चिरंजीव पूर्ती समूहाशी संबंधित होते. आता पूर्ती ही कंपनी 'मानस' या कंपनीमध्ये मर्ज्य झाली असून त्यावरही नितीन गडकरींचे चिरंजीव संचालक आहेत.
मानसचे संचालक समय बनसोड या प्रकरणी बोलताना म्हणाले की, "हे दोन्ही कारखाने विकत घेतले तेव्हाही गडकरी पुर्तीमध्ये नव्हते. विदर्भात सहकार चळवळ ही पूर्णतः फेल ठरली होती, 22 कारखाने बंद झाले होते. त्यावेळी वैनगंगेचा दोनदा लिलाव काढला पण त्याची बोली लावायला कोणीच आलेच नाही. शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव कारखाना जिवंत ठेवा म्हणणाऱ्यानी गडकरींना गळ घातली, तो ऑफ सेट किमतीला घेतला. महात्मा कारखान्याबाबतही तेच घडलं. तसेच अण्णा हजारे, राजू शेट्टी यांच्या तक्रारीवरुन आधी ही या कारखान्यांची चौकशी झाली. त्यामध्येही क्लीन चिट मिळाली."
आपण चौकशी करताना कुठला ही दुजाभाव करत नाहीये हे दाखवण्याचा प्रयत्न ही यादी देताना चंद्रकांत पाटलांचा असू शकतो. मात्र त्यामुळे भाजपच्या प्रादेशाध्यक्षांनी आपल्याच एका हेवी वेट केंद्रीय मंत्र्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर केला नाही ना या चर्चेला मात्र उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MPSC : 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
- Beed : पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पुण्याच्या कंपनीचा बीडकरांना नव्वद लाख रुपयांना गंडा
- रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम; याचा अर्थ भाजपसोबत सरकार बनवणार असा नाही; संजय राऊतांची फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया