Lok Sabha Result 2024 : भाजपच्या नियोजनाअभावीचं उमेदवाराचा पराभव! महायुतीच्या आमदारचे मोठे विधान
Lok Sabha Result 2024 : भाजपच्या नियोजनाअभावीचं महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, अशी टीका भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
Gondia-Bhandra Lok Sabha Result 2024 : भंडारा - गोंदिया लोकसभेच्या (Bhandara Gondia Lok Sabha Election) क्षेत्रात महायुतीचे पाच आमदार आहेत. सहा पैकी पाच आमदार असतानाही पराभव होणं हे आमच्यासाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे. भाजपमध्ये नियोजनाचा अभाव होता. आगामी काळात झालेल्या चुकांची दुरुस्ती करू. तिन्ही पक्षाचे नेत्यांमध्ये पाहिजे ते समन्वय किंवा नियोजन नव्हते. आमदारांवर जबाबदारी देण्यात आली नाही. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. गावीत यांचा संपर्क कमी होता आणि प्रशासनावर पाहिजे तेवढा प्रभाव पडू शकला नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये समाधान निर्माण करू शकले नाही. परिणामी, भाजपच्या (BJP) नियोजनाअभावीचं महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, अशी टीका भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी बोलताना व्यक्त केली आहे.
नियोजनाअभावीचं भाजपच्या उमेदवाराचा पराभव
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेने भाजपसह (BJP) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) दिल्लीला जाऊन अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पोहोचले. अमित शाहांसोबत झालेल्या भेटीनंतर मोठा निर्णय झाला असून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची विनंती फेटाळण्यात आली आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी कायम राहून देवेंद्र फडणवीस हे आता पक्षसंघटनेसाठी काम करणार आहेत. तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीमध्ये झालेल्या पराभवानानंतर नेत्यांच्याही उघडपणे भावना समोर येऊ लागल्या आहे अशातच भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडाऱ्यात झालेल्या पराभवासाठी भाजपच्या नियोजनला जबाबदार ठरवले आहे.
पालकमंत्री हा स्थानिक असणं गरजेचं
भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचा संपर्क कमी होता आणि प्रशासनावर पाहिजे तेवढा प्रभाव पडू शकला नाही. निवडणुकीदरम्यान समन्वय समिती नव्हती आणि पालकमंत्र्यांनी कुणाशीही समन्वय साधला नाही. त्यामुळं पालकमंत्री हा स्थानिक असणं गरजेचं आहे. बाहेरचा पालकमंत्री ही जबाबदारी कशी फिक्स करणार. आगामी विधानसभा निवडणुकीत याचा धोका निर्माण होण्याची शक्यताही नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त करतानाचं भाजपवर निवडणुक काळात नियोजनाचा अभाव दिसून आल्यानं महायुतीचा उमेदवार पराभूत झाल्याची टीका केली आहे.
शिवसेनेनं बोलविली तातडीची बैठक
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या घटक पक्षांनी त्यांच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडल्यानंतर आता शिवसेनेची बैठक बोलविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांना या बैठकीला तातडीनं मुंबईला बोलविलं आहे. या बैठकीकरिता भंडाऱ्याचे शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे ही जात आहे. त्यांनी या बैठकीबाबत दुजोरा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या