Nawab Malik : सत्ताधारी भाजप शिंदे गटाने नवाब मलिकांना घेरले, पण प्रफुल्ल पटेलांवर 'मौनव्रत'; अजित पवार गट लेटरबाॅम्ब टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला!
Ajit Pawar faction on Nawab Malik : नवाब मलिकांवरून आरोप होत असल्याने अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (Maharashtra Assembly Winter Session 2023) अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदार नवाब मलिक (Nawab Malik) चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतर आज (8 डिसेंबर) दुसरा दिवस सुद्धा आमदार नवाब मलिक यांच्या भूमिकेवरून गाजला. मलिक यांनी आज सुद्धा अधिवेशनाला हजेरी लावत काल बसलेल्या ठिकाणी जाऊन बसले. विधानसभा अध्यक्षांनी नवाब मलिक यांना 49 नंबरची खुर्ची बसण्यासाठी दिली होती. मात्र, त्या खुर्चीवर न बसता त्यांनी शेवटच्या बाकावर जाऊन बसणं पसंत केलं. मात्र, नवाब मलिक यांच्यावरून सत्ताधाऱ्यांनीच त्यांना घेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची बाजू सांभाळून घेण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सामील करून घेऊ नये, असं म्हटलं होतं. यानंतर अजित पवार गट कोणती भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं होतं. पहिल्यांदा बोलताना अजित पवार यांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले. 'त्या' पत्राचे मी काय करायचे ते पाहून घेईन तुम्हाला (मीडिया) सांगण्याची गरज नाही, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना घेतली.
अजित पवार गट फडणवीसांच्या भेटीला
त्यानंतर अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोलताना नवाब मलिक यांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे आम्ही नवाब मलिकांच्या बाबतीत भूमिका घेणे अयोग्य असल्याचे फडणवीस यांच्या कानावर घातलं. त्याचबरोबर आमदार म्हणून त्यांना सभागृहात बसण्याचा अधिकार असल्याचे सुद्धा पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.
मलिकांनी भूमिका जाहीर न केल्यामुळे त्यांना जी खुर्ची देण्यात आली होती ती त्यांनी स्वीकारली नसल्याचे पटेल यांनी सांगितले. मलिक यांनी भूमिका स्पष्ट केली असती, तर आम्ही देखील आमची भूमिका जाहीर केली असती, असंही पटेल यांनी सांगितले.
प्रफुल्ल पटेलांवर भाजपचं मौन
दरम्यान, नवाब मलिकांविरोधात भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असली, तरी प्रफुल्ल पटेलांवर भाजपनं मौन बाळगणं पसंत केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवल्यानंतर कोणतीच प्रतिक्रिया दिली. भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रफुल्ल पटेलांवरील आरोपावर उत्तर दिलं नाही. भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकरण वेगळं असल्याचे सांगत पटेलांवर थेट प्रतिक्रिया दिली नाही.
प्रफुल्ल पटेल चालतात, मग नवाब मलिक का चालत नाही?
नवाब मलिक यांचा धर्म पाहून भाजप त्यांना दूर करत आहे का या प्रश्नावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, प्रश्न निर्माण होणारच. दाऊशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांना तुरुंगात टाकले, तर प्रफुल पटेल यांच्यावरही भाजपने इकबाल मिर्ची जो दाऊदचा मित्र आहे त्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर ईडीने प्रफुल पटेल यांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता आणि आठ दिवसांनी अजित पवार मंत्रिमंडळात गेले.
ते पुढे म्हणाले की, एका बाजूला भाजप राष्ट्र प्रेमाची गोष्ट करते आणि त्यांना भ्रष्टाचारी (अजित पवार) चालतात. त्यांना इकबाल मिर्ची या गुन्हेगार आणि दहशतवादाशी संबंधित लोक (प्रफुल्ल पटेल) चालतो मग नवाब मलिक का नाही? ही भाजपची नौटंकी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या