(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on Nawab Malik : 'त्या' पत्राचं काय करायचं ते मी करीन, भूमिका पाहीन; नवाब मलिकांचा विषय निघताच अजितदादांची चिडचिड!
Ajit Pawar on Nawab Malik : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या अनुषंगाने पाठवलेल्या पत्रावर कोणती भूमिका आहे? अशी विचारणा केली असता अजित पवारांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर ते राष्ट्रवादीमध्ये असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून ते दाऊदचे हस्तक असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली होती. मात्र, त्याच नवाब मलिक यांना वैद्यकीय ग्राउंडवर जामीन मिळाल्यानंतर ते सध्या बाहेर आहेत. मलिक यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी बाकांवर हजेरी लावली. यानंतर एकच रणकंदन माजले.
ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचे, असा आरोप भाजपवर होऊ लागला. दिवसभरामध्ये सत्ताधाऱ्यांना दिवसभर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांच्यावर जोवर आरोप आहेत तोपर्यंत त्यांना महायुतीचा भाग करून घेऊ नये असं सांगणारं पत्र धाडलं. यानंतर पुन्हा एकच खळबळ उडाली.
त्यामुळे या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार आता कोणती भूमिका घेणार? याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली होती. आज (8 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा दिवस आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या अनुषंगाने पाठवलेल्या पत्रावर कोणती भूमिका आहे? अशी विचारणा केली असता अजित पवारांची चांगली चिडचिड झाल्याचे दिसून आले.
त्या पत्राचं काय करायचे ते मी करीन, मी तुम्हाला सांगून करणार नाही (Ajit Pawar on Nawab Malik)
त्या पत्राचं काय करायचे ते मी करीन, मी तुम्हाला (मीडिया) सांगून करणार नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली त्याचबरोबर प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. नवाब मलिक यांच्याशी बोलून त्यांची भूमिका काय आहे हे पाहिल्यानंतरच मी माझा निर्णय आणि पक्षाची भूमिका जाहीर करीन असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी मी पत्र वाचलं आहे, असे त्यांनी सांगितलं. कोण कुठं बसलं हे टीव्हीवाल्यांनी दाखवून दिलं असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांकडून पत्रावर मौन (Devendra Fandnavis on Nawab Malik)
त्यामुळे एकंदरीत नवाब मलिक यांची बाजू सांभाळून घेताना अजित पवार यांची चांगलीच चिडचिड झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांना या संदर्भात विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले. त्यामुळे आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये नवाब मलिक नेमके कोठे बसणार? सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधक कोणती भूमिका घेणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या