Bharat Jodo: भारत जोडो यात्रा विदर्भातील वाशिममध्ये; मेधा पाटकर, तुषार गांधी सहभागी होणार, असा आहे आजचा कार्यक्रम
Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील दहावा दिवस असून या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी होणार आहेत.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील वाशिममध्ये असणार आहे. भारत जोडो यात्रेचा आजचा 70 वा दिवस तर महाराष्ट्रातील 10 वा दिवस आहे. मंगळवारी या यात्रेने विदर्भात प्रवेश केला असून आज ती वाशिममधील मालेगाव या ठिकाणाहून सुरू होणार आहे. या यात्रेत आज सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सहभागी होणार आहेत.
भारत जोडो यात्रेने 7 नोव्हेंबरला तेलंगणातून देगलूरमार्गे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला होता. हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाक्यावरुन पैनगंगा नदी ओलांडत भारत जोडो यात्रा मंगळवारी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि विदर्भातील इतर प्रमुख नेते होते. पुढचे पाच दिवशी ही यात्रा विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यातून जाणार आहे.
आज या यात्रेत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी सामिल होणार आहेत. दुपारी दोन वाजता ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच या यात्रेत आज विदर्भातील काँग्रेसचे प्रमुख नेते सामील होणार आहेत. अकोल्यातील पातूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेचा आजचा मुक्काम असणार आहे.
असा असेल आजचा भारत जोडो यात्रेचा कार्यक्रम
- सकाळी 6 वाजता- रामराव सरनाईक विद्यालय वाशिम येथून मालेगाव येथे यात्रा रवाना होणार.
- सकाळी 10 वाजता- वाशिम येथील मालेगाव येथे विश्रांती.
- दुपारी 4 वाजता- पदयात्रेला पुन्हा सुरुवात होणार.
- संध्याकाळी 7 वाजता- मेडशी येथे संध्याकाळचा ब्रेक आणि कॉर्नर सभा.
- नाईट हॉल्ट- साईबाबा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी, पातूर, अकोला.
बुलढाण्यात एक हजार वारकरी रिंगण करुन स्वागत करणार
येत्या 18 तारखेला खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे येणार आहे. शेगाव-बाळापूर मार्गावरील जवळा-वरखेड गावाजवळील या मार्गावर विष्णुपंत हरिभाऊ कानडे या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याच्या चार एकर शेतात 20 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारुन त्याभोवती एक हजार वारकरी रिंगण सोहळा करुन राहुल गांधी यांचं स्वागत करणार आहेत. यावेळी राहुल गांधी हे देखील वारकऱ्यांचा वेष परिधान करुन त्यांच्यासोबत पावलं टाकत रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.