बीडमध्ये मराठा-ओबीसी कार्यकर्ते आमने सामने, वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
बीडच्या (Beed) मांजरसुंबा परिसरात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. याचवेळी काही ओबीसी कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
बीड : बीडच्या (Beed) मांजरसुंबा परिसरात मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. याचवेळी काही ओबीसी कार्यकर्त्यांकडून वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. याचवेळी ते मांजरसुंबा परिसरात येण्यापूर्वी ओबीसी कार्यकर्त्यांनी आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी केली.
वाल्मीक अण्णा तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. वाल्मिक अण्णा अंगार हे बाकी सब भंगार है.. या आशयाची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या घोषणामुळं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी ही परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केले होते. यानंतर सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्यचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सहामागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली होती
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हे कारागृहात आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. वाल्मिक कराड हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. त्यामुळं या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामादेखील दिला होता.
वाल्मिक कराडबाबत पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबरला होणार
या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे जामीन आणि दोषमुक्ती अर्ज अद्याप निकाली लागलेले नाहीत. 30 ऑगस्ट रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीत काही आरोपींच्या अर्जांवर निर्णय राखून ठेवण्यात आला. तर काही अर्जांबाबत मूळ फिर्यादीचे म्हणणे न्यायालयासमोर न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या खटल्यातील महत्त्वाचा आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनाबाबत देखील पुढील सुनावणी आता 10 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे कराडला जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक जण आरोपी म्हणून अडकले असून, काहींनी दोषमुक्तीची मागणी तर काहींनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.


















