Beed: शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी नदीचा नाला केला, कागदपत्रे रंगवली; परळी नगरपरिषदेचा आणखी एक प्रताप
या कॉम्प्लेक्सच्या अतिक्रमणामुळे नदीचं मूळ पात्र संकुचित झाल्यानं याचा मोठा फटका शहरवासीयांना बसलाय. गेल्या दोन वेळच्या अतिवृष्टीत नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

Beed: कागदपत्रांचे वाट्टेल तसे घोडे नाचवत मनमानी कारभार करता येतो हे परळीत नवं नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी नदीचा नाला करत कागदपत्रे रंगवल्याचा आणखी एक प्रताप परळी नगरपरिषदेने केल्याचं समोर आले आहे.नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जुगल किशोर लोहिया यांनी यासंदर्भात नवा खुलासा करत सांगितलं की, नगर परिषदेने सरस्वती नदीला ‘नाला’ म्हणून दाखवून शॉपिंग कॉम्प्लेक्सचं बांधकाम सुरू करण्यात आलं आहे.. तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने या बांधकामासाठी अधिकृत परवानग्या घेतल्या नव्हत्या, असा गंभीर आरोप लोहिया यांनी केला आहे. इतकंच नव्हे, तर या संपूर्ण प्रकाराची माहिती नगरपरिषदचे मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनाही दिली होती, असंही लोहिया यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता परळीत नदीच्या अतिक्रमणावरून आणि परवानग्यांवरून होणारे घोळ पुन्हा एकदा समोर आले आहेत. (Parli Saraswati River)
शहरातील सरस्वती नदीत अवैधरित्या भराव टाकण्यात आली असून येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. यावरून मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशासनाला फैलावर घेतले होते. दरम्यान,आता नदीला नाला दाखवत अवैध बांधकाम झाल्याचंही समोर येत आहे.
सरस्वती नदीच्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर
या कॉम्प्लेक्सच्या अतिक्रमणामुळे नदीचं मूळ पात्र संकुचित झाल्यानं याचा मोठा फटका शहरवासीयांना बसलाय. गेल्या दोन वेळच्या अतिवृष्टीत नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. ही संपूर्ण परिस्थिती त्या अनधिकृत कॉम्प्लेक्सच्या बांधकामामुळेच निर्माण झाली, असा ठपका त्यांनी ठेवला आहे. सरस्वती नदीचं मूळ पात्र सुमारे 60 फूट रुंद होतं, मात्र आता ते 15 ते 20 फूटांवर आलं आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागाच उरलेली नाही, त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रशासनाने नागरिकांची दिशाभूल करून नदीच्या पात्रात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा राहावा म्हणून योजना आखली. अशा प्रकारे नदीचं स्वरूप बदलवून बांधकाम करण्याचं हे एक धोकादायक उदाहरण असल्याचं मत लोहिया यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे लोहिया यांनी मागणी केली की, सरस्वती नदीचं मूळ पात्र मोठं करण्यात यावं आणि त्या ठिकाणी रिटर्निंग वॉल बांधण्यात यावा, जेणेकरून भविष्यातील पूरस्थिती टाळता येईल आणि नागरिकांचं नुकसान थांबवता येईल. या प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असून, स्थानिकांनीही याची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा:























