सावधान ! मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले, बीड लातूरसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे इशारे
Beed : लातूर जिल्ह्यातून 145 किमी अंतर पार करत वाहणारी ही नदी. याच नदीवर मांजरा धरण बांधले असून ते लातूरकरांच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे.

Beed: मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने बीड, धाराशिव लातूर जिल्ह्यात बऱ्याच भागांना तडाखा बसलाय . लातूर-धाराशिव आणि बीड जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असलेल्या मांजरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणारे हे मुख्य धरण 90% पेक्षा अधिक भरल्यामुळे प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय ..
मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले
मांजरा धरणातील 4 वक्रद्वारे प्रत्येकी 0.25 मीटर उंचीने उघडून 3494.28 क्यूसेक्स (98.96 क्यूमेक्स) इतका विसर्ग मांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पुढील पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांना इशारा
नदीकाठावरील तसेच पुरामुळे बाधित होऊ शकणाऱ्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणीही नदीपात्रात उतरणार नाही.जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशा सूचना करण्यात आल्या आहेत . बीड, लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने याबाबतचे पत्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते . आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश यात दिले होते.
नदीकाठच्या गावकऱ्यांनी अनावश्यक धोका न पत्करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात येत आहे. विशेषतः पूरकाठावरील शेती, जनावरांचे चारण तसेच घरांची सुरक्षितता याकडे ग्रामस्थांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
18 तासातच मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के वाढ
मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासातच या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात 22 टक्के इतकी मोठी वाढ झालीय. 15 ऑगस्ट रोजी दुपारी या धरणात 57 टक्के असलेला पाणीसाठा 16 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता थेट 80 टक्क्यावर पोहोचला आहे. यामुळे आता पुढील दोन वर्षापर्यंत परिसरातील पाणी प्रश्न मिटला आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रकल्पापैकी मांजरा एक असून याच मांजरा धरणातून बीड, लातूर,धाराशिव जिल्ह्यातील 22 गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी देखील वापरण्यात येते.
मांजरा नदीची वैशिष्ट्ये
लातूर जिल्ह्यातून 145 किमी अंतर पार करत वाहणारी ही नदी. याच नदीवर मांजरा धरण बांधले असून ते लातूरकरांच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. नदीपात्रात सध्या पाण्याची मुबलकता असून तिच्यावर 11 बॅरेजेस बांधण्यात आले आहेत. रेना, तावरजा, तेरणा या नद्या तसेच अनेक ओढे मांजरा नदीत मिळत असल्याने प्रवाह अधिक वाढला आहे.























