(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar On Baramati Loksabha Election : बारामतीच्या आत्या विरुद्ध काकीच्या लढाईवर रोहित पवार पहिल्यांदा स्पष्टच बोलले, म्हणाले...
भाजपला बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक करायची आहे. मात्र पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ नये, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
बारामती, पुणे : बारामती लोकसभा मतदार (LokSabha Election 2024) संघात सध्या पवार घराण्यातील नणंद विरुद्ध भावजय या उमेदवारीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर आता आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. भाजपला बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक करायची आहे. मात्र पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ नये, अशी भावना रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीमुळे पवार कुटुंबियात वाद नको, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार ?
'राज्यात किंवा बारामतीत भाजपला जे हवं होतं. ते त्यांनी केलं आहे. अजित पवारांचा चांगला वापर भाजपने केला आहे. मागील अनेक वर्षात शरद पवार आणि पवार कुटुंबीय पुरोगामी विचार या महाराष्ट्रात टिकावा यासाठी संघर्ष केला. त्यामुळे भाजपला अनेकवेळा अडचणीत यावं लागलं आणि आता पवार विरुद्ध पवार लढाई उभी केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होत आहे. त्यामुळे बारामती लोकसभेसंदर्भात बोलायचं झालं तर जो निकाल लागेल त्यामध्ये भाजपला जे हवं ते झालं आहे. पवार विरुद्ध पवार हे लढाई सुरु झाली आहे. भाजपने चाणक्यशाहीचा कितीही प्रयत्न केला तरी सामान्य लोक हा निकाल पुरोगामी विचारांचा आणि शरद पवारांच्या बाजूने देतील', असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
पवार विरुद्ध पवार होऊ नये,संयुक्त ताकद नेहमीच मोठी
सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचा निर्णय अजित पवार घेतील. त्याचा आता वेगळा चोरलेला पक्ष आहे. त्यामुळे अजित पवार बारामतील जी भूमिका घेतील. त्यावर अजित पवारांचा पक्ष चालणार आहे. बारामतीलला त्यांचा उमेदवार घोषित झाला की आम्ही आमचा उमेदवार घोषित करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कुटुंबीय म्हणून पवार विरुद्ध पवार होऊ नये,संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते. मात्र भाजपला जे हवंय तेच अजित पवार करत असतील तर हा त्यांचा विषय आहे. उमेदवार कोणताही असो आम्ही ताकदीने निवडणूक लढणार असल्याचं ते म्हणाले.
विधानसभा-लोकसभा निवडणुकीत (Assembly - Lok Sabha Elections) 'फोन टॅप' करण्यासाठी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्यात आली असावी, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी खोचक टोला लगावला आहे.
इतर महत्वाची बातमी-
विधानसभा-लोकसभा निवडणुकीत 'फोन टॅप' करण्यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ; रोहित पवारांचा खोचक टोला