विधानसभा-लोकसभा निवडणुकीत 'फोन टॅप' करण्यासाठी रश्मी शुक्लांना मुदतवाढ; रोहित पवारांचा खोचक टोला
Rashmi Shukla Extension : रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलतांना रोहित पवार यांनी टीका केली आहे.
Rashmi Shukla Extension : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून, रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आता यावरून विरोधकांकडून टीका होतांना पाहायला मिळत आहे. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत (Assembly - Lok Sabha Elections) 'फोन टॅप' (Phone Tap) करण्यासाठी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्यात आली असावी, असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) खोचक टोला लगावला आहे.
रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, “भाजप कधीही कायदा पाळत नाही. लोकसभेत फायदा व्हावा यासाठी हे रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिले जात आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत यांना फायदा होण्यासाठी हे केले जात आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर यापूर्वी फोन टॅपिंगमुळे कारवाई करण्यात आली होती. माझ्या अंदाजाने काही फोननंबर टॅपिंगला दिले असावेत, त्यात माझाही नंबर असावा. मात्र, आम्ही लोकांच्या हिताची कामे या व्यतिरिक्त काही बोलत नाही, असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळणार, मुख्यमंत्री देखील सकारात्मक
राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. रश्मी शुक्ला पुढील काही महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. असे असतानाच त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सकारात्मक असून, लवकरच फाईलवर सही करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आणखी चार महिने शिल्लक असून, त्यापूर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये : रोहित पवार
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार असल्याने पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. यावर बोलतांना रोहित पवार म्हणाले की, "पवार विरूद्ध पवार हेच भाजपला हवं होतं. मात्र, चाणक्य लोकं मतांतून निर्णय घेतील. दादांच्या भूमिकेबद्दल मी काय बोलणार, चोरलेला पक्ष का असेना कुठला उमेदवार द्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. पवार विरूद्ध पवार लढाई होऊ नये या मताचा मी आहे. मात्र, भाजपच्या सांगण्यावरून दादा निर्णय घेत असतील तर कठीण आहे, असे रोहित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :