Balasaheb Thackeray | शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली. फडणवीसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. स्वाभिमान, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व याला उत्तर दिलं जाईल. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे.
राज्यातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी संजय राऊत आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. शिवाय उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत असल्याने संजय राऊत दिल्लीला जाऊ शकतात. त्यानंतर 19 नोव्हेंबरला संजय राऊत सोनिया गांधी, अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तास्थापनेबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. तिन्ही पक्षांचे नेते लवकरच राज्यात सत्तास्थापन होईल, असं सांगत आहेत. मात्र तिन्ही पक्षांची विचारधारा भिन्न असल्याने सत्तास्थापनेआधी कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अंतिम अहवाल तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. त्यावर चर्चा करुन नंतर अंतिम निर्णय ठरु शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आज सोनिया गांधी यांची भेट घेणार होते. मात्र दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शरद पवार आज पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीला पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी शरद पवार आणि सोनिया गांधीची भेट सोमवारी होणार असल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या बैठकीत महाशिवआघाडीसंर्भात ठोस निर्णय होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.