Badlapur Assault Case : अक्षय शिंदेच्या वडिलांचा दोष नाही, घर, नोकरीसाठी प्रयत्न करता येतील का? न्यायालयाची सरकारला विचारणा
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पालकांनी आम्हाला कोणी काम देत नाही, असं न्यायालयाने सांगितलं आहे.
मुंबई : बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या दुष्कृत्यात सहभागी असलेल्या आरोपी आक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सध्या हयात नाही. मात्र त्याच्या मृत्यूनंतर आता अक्षय शिंदे यांच्या पालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी लक्ष्य केलं जातंय, असा आरोप अक्षय शिंदेच्या पालकांनी केला आहे. त्यानंतर सरकारने अक्षयच्या पालकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करता येईल का? अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षयच्या पालकांना राज्य सरकारने मदत करावी, अशी सूचना केली आहे. अक्षय शिंदेच्या पालकांचा निवारा आणि रोजगार याची काही तजवीज होऊ शकते का, याचा सरकारने विचार करता येईल का, असे न्यायालयाने विचारले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्याय पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान, अक्षय शिंदेच्या पालकांशी संवाद साधला. त्यानंतर न्यायालयाने सरकारला उद्देशून वरील मत व्यक्त केले.
अक्षय शिंदेच्या पालकांना घरातून हाकलून दिलं?
अक्षय शिंदेच्या पालकांना सध्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तसा दावा त्यांनी न्यायालयात केला आहे. आम्ही कुठेही गेल्यावर आम्हाला लक्ष्य केलं जातं. आमचे बदलापुरात घर आहे. पण आम्हाला आमच्याच घरात राहता येत नाही. आम्हाला आमच्या घरातून हाकलण्यात येतं. आम्ही सध्या कल्याणच्या रेल्वे स्थानकावर राहात आहोत. आम्हाला कोणी नोकरीही देत नाही. त्यामुळे आमच्याकडे सध्या पैसे नाहीत, असे मृत अक्षय शिंदेच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने नेमकी काय सूचना केली?
अक्षय शिंदेच्या पालकांची ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. आक्षय शिंदेचे आई-वडील यांचा दोष नाही. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारला प्रयत्न करता येईल का. मुलाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पालकांना देता येऊ शकत नाही. पालकांना सरकार तसेच नागरिकांच्या रोषाचा सामना कारवा लागू नये, असे न्यायालय म्हणाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
हेही वाचा :
अक्षय शिंदे अत्याचार प्रकरणातील शाळेच्या ट्रस्टींची सुटका; न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर